उस्मानाबाद, जिल्हा परिषदेत शुकशुकाट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

उस्मानाबाद - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत, तर विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही निवडणुकीच्या धामधुमीत असल्याने सध्या जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. 

उस्मानाबाद - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत, तर विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही निवडणुकीच्या धामधुमीत असल्याने सध्या जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रमुख घटक म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. कोट्यवधी रुपयांची विकासकामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात होतात. त्यामुळे जिल्हा परिषदेचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. परंतु, सध्या जिल्हा परिषदेचे कारभारी ठरविण्याची वेळ आल्याने ग्रामीण भागात राजकीय आखाडा पेटला आहे. जिल्ह्यात सर्वत्र चौरंगी लढती होत आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचाराने ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघत आहे. 

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेत मोठी गर्दी असते. उपलब्ध निधी खर्च व्हावा, यासाठी प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांची रांग लागलेली असते. परंतु, सध्या सर्वच कार्यकर्ते प्रचारात गुंतले असल्याने जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. त्यातच अनेक कर्मचारी निवडणूक विभागात नियुक्‍त करण्यात आले आहेत. काही कर्मचारी निवडणुकीचे काम सांगून दांड्या मारत आहेत. 

कामाच्या निमित्ताने ग्रामीण भागातून अनेक नागरिक जिल्हा परिषदेत येत आहेत. आलेल्या नागरिकांना कर्मचारी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वेळेवर होणारी कामे होण्यास विलंब होत आहे. या सर्व बाबींचा अंदाज घेऊन ग्रामीण भागातील गरजू नागरिकही सध्या जिल्हा परिषदेत फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कायम गजबजलेला जिल्हा परिषदेचा परिसर सध्या ओस पडल्याचे दिसून येत आहे. 

नगरपालिकेतही शुकशुकाट 
दैनंदिन कामाच्या निमित्ताने दररोज शेकडो नागरिक पालिकेच्या कार्यालयात येतात. नळाला पाणीच येत नाही, रस्त्यावरील दिवे बंद आहेत, अशा अनेक तक्रारी घेऊन नागरिक पालिकेत येतात. परंतु निवडणुकीच्या निमित्ताने पालिकेचे अनेक कर्मचारी कामावर गेल्याने कामकाज ढेपाळले आहे. गेल्या वर्षी पालिकेची निवडणूक होती, म्हणून पालिकेच्या कार्यालयात शुकशुकाट होता. आता जिल्हा परिषदेची निवडणूक असून कर्मचारी कमी असल्याने नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

Web Title: Osmanabad District Council