उस्मानाबाद जिल्ह्यावर यंदाही दुष्काळाचे ढग गडद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

उस्मानाबाद - पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील २७ गावांत ८५ हजार १८१ नागरिक ४० टॅंकरद्वारे तहान भागवित आहेत. ६४ गावांत १४५ विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २११ प्रकल्पांत केवळ ११ टक्केच पाणीसाठा असल्याने जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाची छाया गडद झाली आहे. 

 

उस्मानाबाद - पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील २७ गावांत ८५ हजार १८१ नागरिक ४० टॅंकरद्वारे तहान भागवित आहेत. ६४ गावांत १४५ विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २११ प्रकल्पांत केवळ ११ टक्केच पाणीसाठा असल्याने जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाची छाया गडद झाली आहे. 

 

गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा पावसाने सुरवातीलाच दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या बहुतांश भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यामुळे गेल्या चार वर्षांतील दुष्काळ हटेल, अशी चिन्हे होती. शेतकरीवर्गातही आनंदाचे वातावरण होते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. ऑगस्टच्या सुरवातीपासून पाऊस गायब झाल्याने रब्बी पिके करपत आहेत. 

 

जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या ९० टक्के पेरणी सोयाबीनची झाली आहे. ऐन फुलोऱ्यात असताना पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी सोयाबीनच्या झाडाला शेंगाच नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कळंब तसेच उस्मानाबाद तालुक्‍यांत अजूनही पावसाने पन्नास टक्‍क्‍यांची सरासरी ओलांडलेली नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी अजूनही वाढलेली नसल्याने पुढील काळात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

 

टॅंकरचा ससेमिरा सुटेना

गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात टॅंकर सुरू आहेत. यंदा यामध्ये बदल होईल, अशी चिन्हे पावसाळ्याच्या सुरवातीला दिसत होती. आता पावसाळा संपत येत आला तरीही जिल्ह्यातील टॅंकर बंद झालेले नाहीत. जिल्ह्यातील २७ गावांची तहान टॅंकरद्वारे भागवत आहेत. उस्मानाबाद तालुक्‍यातील २२ गावांतील ६२ हजार ९०१ लोकसंख्या तसेच कळंब तालुक्‍यातील पाच गावांतील २२ हजार २८० लोकसंख्या टॅंकरच्या पाण्याने तहान भागवित आहे. दोन्ही तालुक्‍यांतील २७ गावांत सध्या ४० टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी ६४ गावांतील १४५ विंधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

 

प्रकल्प कोरडेठाक

जिल्ह्यात एकूण २११ प्रकल्प आहेत. यामध्ये मोठा एक, मध्यम १७ तर लघु प्रकल्प १९३ आहेत. यातील मोठा एक प्रकल्प तसेच १७ मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. १९३ लघु प्रकल्पांमध्ये केवळ पावणेचार दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या एकूण प्रकल्पांतील टक्केवारी केवळ ११ टक्के असल्याने यंदाही जिल्ह्यात दुष्काळाचे ढग अधिकच गडद होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Osmanabad district FIG drought dark clouds