
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यात बदली होऊन आल्यानंतर पहिल्यांदाच नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथील भुईकोट किल्ल्यास शनिवारी (ता.२६) कुटुंबियासह भेट देऊन पाहणी केली.
नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) : जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यात बदली होऊन आल्यानंतर पहिल्यांदाच नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथील भुईकोट किल्ल्यास शनिवारी (ता.२६) कुटुंबियासह भेट देऊन पाहणी केली. भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला असल्यामुळे या ठिकाणी सोयीसाठी प्रदुषण विरहित इलेक्ट्रिकल कार आहे. बहुतेक वेळा अधिकारी अथवा प्रतिष्ठित व्यक्ती या कारचा वापर करतात. मात्र श्री.दिवेगावकर यांनी संपूर्ण किल्ला पायी फिरण्याबरोबरच उंच असलेला उपली बुरूजही चढून पाहिला.
जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ल्यातील अनेक पुरातन वास्तुंचे छायाचित्रेही काढले. सकाळी अकरा वाजता किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत किल्ल्याची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता हा माझा खासगी दौरा असून लवकरच किल्ल्यात येणार आहे. त्यावेळी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. किल्ल्यातील पाणी महल, उपळी बुरूज, मुन्सिफ कोर्ट यासह पुरातन तोफ, बारादरी, पाणचक्कीचे निरीक्षण करुन ऐतिहासिक वस्तुंची माहिती घेतली. यावेळी मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी तुकाराम कदम, लिपिक फुलारी, किल्लेदार गवळी व युनिटी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर