खड्‌डे चुकवत करावा लागतो प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

कन्हेरी फाटा ते वाशी रस्त्याची दुरवस्था 
रस्त्यालगतच्या झाडाच्या फांद्यांमुळे अपघाताचा धोका 
वाहनचालकांना नाहक त्रास 

वाशी (जि. उस्मानाबाद) : कन्हेरी फाटा ते वाशी रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्‌डे चुकवत ये-जा करताना वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि आता रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे अपघाताचा धोका आहे. बांधकाम विभागाने दुर्लक्षित धोरण अवलंबल्याने तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. 

अपघाताचा धोका 
ग्रामीण भागाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. हीच अवस्था वाशी फाटा ते वाशी शहर व कन्हेरी फाटा ते वाशी शहर या रस्त्याची झालेली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवत ये-जा करताना वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्यांचाही सामना करावा लागत आहे. 

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

कन्हेरी फाटा ते वाशी शहर या रस्त्यावर कन्हेरी फाट्याजवळील एका झाडाची फांदी ही मुलांच्या हाताला येईल एवढ्या अंतरावर रस्त्याच्या मधोमध लोंबकळत आहे. वळणावर असलेल्या या फांदीमुळे अपघाताचा धोका आहे. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली अन या गावात झाली मारामारी

हेही वाचा : सत्तासंर्घषाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात बंदोबस्त वाढवला

नागरिकांची गैरसोय 
कन्हेरी फाटा ते वाशी या रस्त्यावर न्यायालय, तालुका कृषी, सार्वजनिक बांधकाम, तहसील, पंचायत समिती आदी कार्यालयांसह बसस्थानक आहे. शहरातील अनेक शेतकऱ्यांची शेती रस्त्यालगत असल्याने दिवसभर मोठी वर्दळ असते. मात्र ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांसह आता झाडांच्या फांद्या लोंबकळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवून लोंबकळणाऱ्या फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad-Drivers suffer unbearably