‘त्या’ युवकासह वडीलही विलगीकरण कक्षात

जगदीश कुलकर्णी
शनिवार, 4 एप्रिल 2020

साहरंगपूर येथे शिक्षणासाठी आलेला तुळजापूर शहरातील हा युवक दोन दिवसांपूर्वी दिल्लीमार्गे हैदराबाद येथून परतला होता. मात्र, त्याने आपल्या प्रवासाची माहिती प्रशासनाला दिली नव्हती.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : साहरंगपूर येथून शहरात आलेल्या एका युवकासह त्याच्या वडिलांना येथील विलगीकरण कक्षात शुक्रवारी (ता. तीन) रात्री साडेदहाच्या सुमारास दाखल करण्यात आले आहे. सध्या विलगीकरण कक्षात एकूण १६ जण दाखल असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी (ता. चार) देण्यात आली.

शहरातील एक युवक साहरंगपूर येथे शिक्षणासाठी आहे. तो दिल्लीमार्गे हैदराबाद येथून शहरात आला होता. मागील दोन दिवसांपासून तो शहरात वास्तव्यास आहे; मात्र सदर युवकाने अथवा त्याच्या नातेवाइकाने तो साहरंगपूर येथून दिल्लीमार्गे हैदराबादेतून तुळजापूर येथे आला असल्याची माहिती प्रशासनास कळविली नाही.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात असल्याची माहिती पालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन त्याची चौकशी केली; तसेच त्याला विलगीकरण कक्षात शुक्रवारी आणण्यात आले. त्यानंतर त्याच्या वडिलांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

युवक साहरंगपूर येथून हैदराबादमार्गे तुळजापूर शहरात आला होता. त्याची चौकशी करून त्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 
- आशिष लोकरे, मुख्याधिकारी, तुळजापूर 
येथील विलगीकरण कक्षात सध्या १६ जण आहेत. त्यामध्ये साहरंगपूर येथून आलेला युवक, त्याच्या वडिलांचा समावेश आहे; तसेच लोहारा तालुक्यातील एका व्यक्तीच्या संपर्कात तुळजापूर तालुक्यातील नऊजण आले होते. त्यांनाही येथील विलगीकरण कक्षात गुरुवारी (ता. दोन) रात्री दाखल करण्यात आले आहे. अन्य पाचजणांनाही विलगीकरण कक्षात आणले आहे. 
- डॉ. प्रवीण रोचकरी, अधिष्ठाता, उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad The father along with the 'that' young man in the Isolation ward