दोन एकर क्षेत्रातील काकडीचे मोफत वाटप

अविनाश काळे
Tuesday, 7 April 2020

उमरगा तालुक्यातील बाबूळसर येथील बाळासाहेब सूर्यवंशी या शेतकऱ्याने हाताशी आलेली काकडी बाजारपेठेत जात नसल्याने गावातील लोकांना मोफत वाटप सुरू केले आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे गावासह जिल्हा, परजिल्हा व राज्य सीमा बंद झाल्याने वाहतूक व्यवस्थेसह बाजारपेठा ठप्प आहेत. यात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.

उन्हाळ्यातला गावरान मेवा म्हणून परिचित असलेल्या कलिंगडाचे रानावर नुकसान झाले आहे. तर उठाव नसल्याने काकडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बाबूळसर येथील एका शेतकऱ्याने हाताशी आलेली काकडी बाजारपेठेत जात नसल्याने गावातील लोकांना मोफत वाटप सुरू केले आहे. त्यांच्या दानशूर कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा- धक्कादायक घाटी रुग्णालयात ब्रदरला कोरोनाची लागण

कोरोना विषाणूचा संसर्गाची भयानक स्थितीने सर्वांना घरी बसविले आहे. त्यात शेतकरी तरी कसे सुटणार. उन्हाळ्यात चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी काकडीची लागवड केली. बाबळसूर येथील शेतकरी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मोठी मेहनत करून दोन एकर क्षेत्रात काकडीची लागवड केली. काकडी काढणीला आली, मात्र तब्बल २० दिवसांपासून बाजारपेठ बंद असल्याने वेलीला ओझे झालेल्या काकडीची काढणी करणे गरजेचे झाले होते.

उठावच नसल्याने काकडीचे नुकसान करण्यापेक्षा पुण्य तरी लागेल या हेतूने गावातील लोकांना श्री. सूर्यवंशी यांनी शनिवारपासून (ता. चार) काकडीचे मोफत वाटप सुरू केले आहे. दररोज तीस ते चाळीस कॅरेट काकडी काढण्यासाठी खर्च येतो. मात्र तरीही काढलेली काकडी लोकांना विनामोबदला देण्यात येत आहे.

गेल्या महिनाभरापासून उठाव नसल्याने जवळपास एक लाखाचे नुकसान सहन करावे लागले आहे. लॉकडाऊनची मुदत पुन्हा वाढली तर आणखी आर्थिक फटका बसणार असल्याचे श्री. सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Free distribution of cucumber