संमेलनात असणार भव्य ग्रंथप्रदर्शन

File photo
File photo

उस्मानाबाद : येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भव्य ग्रंथदालन असणार आहेत. सुमारे तीनशे स्टॉल उभारण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. 


येथे 10 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेतर्फे संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. संमेलनाच्या तयारीतील अनेक बाबींपैकी ग्रंथप्रदर्शन हा एक महत्त्वाचा भाग. त्यावरही संयोजन समितीतर्फे तयारी सुरू झाली आहे.

सुमारे तीनशे स्टॉल

ग्रंथप्रदर्शनासाठी सुमारे तीनशे स्टॉल तयार करण्याचा निर्णय झाला. 25 डिसेंबरपासून सोडत पद्धतीने या स्टॉलचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी साहित्य महामंडळाच्या नियमानुसार प्रक्रिया अनुसरली जाणार आहे. यासाठी कुंडलिक अतकरे, साकेत भांड, सुनीताराजे पवार, बालाजी तांबे यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रंथप्रदर्शनासाठी मुंबई साहित्य संघ (मुंबई), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), विदर्भ साहित्य संघ (नागपूर) आदी घटक संस्थांकडून पुस्तक स्टॉलसाठी नोंदणी केली जात आहे. त्याचप्रमाणे साहित्य संमेलनाच्या येथील संपर्क कार्यालयातही नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

नोंदणी अर्ज उपलब्ध

सर्वसाधारणपणे या संमेलनात सर्वाधिक गाळे हे पुण्याचे असतात. या निरीक्षणाच्या अनुषंगाने "मसाप'ने नोंदणी अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. मुंबईतूनही नोंदणी केली जात आहे. 25 डिसेंबर ही स्टॉल नोंदणीसाठीची अंतिम मुदत आहे, असे कार्यवाह रवींद्र केसकर यांनी सांगितले. 

विमा काढण्याबाबत चाचपणी 
ग्रंथप्रदर्शनातील स्टॉल, पुस्तके व अन्य साहित्यांचे नैसर्गिक व अन्य आपत्तींपासून संरक्षण व्हावे, यासाठी पुस्तकांचाही विमा काढण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. स्टॉलच्या परिसरात अग्निरोधक यंत्रणाही बसविण्यात येणार आहे. साहित्य महामंडळाच्या निकषांनुसार ग्रंथप्रदर्शनाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली. 

ग्रंथप्रदर्शनाला वाचकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, खरेदी करावी, या उद्देशाने शाळा, महाविद्यालयीन वाचनालये, सार्वजनिक वाचनालयांशीही संपर्क साधला आहे. प्रदर्शनात सवलतीत पुस्तके मिळणार असल्यामुळे यंदा पुस्तकांची विक्रमी विक्री होईल, असा विश्वास आहे. 
नितीन तावडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com