esakal | ‘त्या’डॉक्टरांना तातडीने नियुक्त्या
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदार राहुल मोटे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आरोग्य विभागावर मोठा ताण पडला असून, समुदाय आरोग्य अधिकारी पदावरील डॉक्टरांची नियुक्ती केल्यास काही प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होऊन काम अधिक गतीने होईल, असा विश्वास माजी आमदार राहुल मोटे यांनी व्यक्त केला आहे.

‘त्या’डॉक्टरांना तातडीने नियुक्त्या

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : समुदाय आरोग्य अधिकारी पदावरील डॉक्टरांना तातडीने नियुक्त्या देऊन सेवेत सहभागी करण्याची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी प्रशासनाकडे केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आरोग्य विभागावर मोठा ताण पडला असून, या आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यास काही प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होऊन काम अधिक गतीने होईल, असा विश्वास माजी आमदार मोटे यांनी व्यक्त केला आहे.

काही महिन्यांपूर्वी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यात भरती झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी या पदाचे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत; परंतु त्यांची एक्झिट एक्झाम न झाल्याने त्यांच्या नियुक्त्या लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे. शिवाय या नियुक्त्या करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर असल्याने त्या सर्वांना काही महिन्याच्या करारावर नियुक्त करून या आणीबाणीच्या वेळी त्यांची मदत प्रशासनाने घ्यावी. या प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना आपण तात्पुरत्या स्वरूपात तत्काळ नियुक्त्या दिल्या तर आरोग्य विभागावरील ताण यानिमित्ताने कमी होण्यास मदत मिळणार आहे.

हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

आज देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील परिस्थिती आणीबाणीची बनली आहे. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्ण अद्याप तरी सापडले नाहीत, परंतु एकूणच परिस्थिती पाहता आपल्याला या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवे. आज ग्रामीण भागात कोरोनाच्या भीतीने आणि पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अभावामुळे अनेक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रॅक्टिस बंद करून आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढताना दिसत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. तेव्हा शासकीय पातळीवर काही पावले उचलून समुदाय आरोग्य अधिकारी पदावरील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या दिल्यास आरोग्य विभागावरील मोठा ताण कमी होणार आहे.

शिवाय या तरुण अधिकाऱ्यांना यानिमित्ताने काम करण्याची संधीही मिळणार आहे. एका बाजूला वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असताना दुसऱ्या बाजूला प्रशिक्षण घेतलेले जवळपास शंभर अधिकारी यानिमित्ताने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तयार आहेत. या दोन्ही बाजूंचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर हा निर्णय घेण्याची अपेक्षा माजी आमदार राहुल मोटे यांनी व्यक्त केली आहे. 
......

loading image