पंधरा दिवस झाले, आता आम्हाला सोडा...

सयाजी शेळके
Monday, 27 April 2020

गेल्या अठरा दिवसांपासून दैनंदिन गरजांची पूर्तता करीत त्यांच्या समस्या जाणून घेत सतत संवाद साधला जात आहे. कोरोनासारख्या आपत्तीवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवश्यक असल्याचे पटवून दिले जात आहे.

उस्मानाबाद : 'पंधरा दिवस झालं, हित हाऊत. आम्हाला कुठलाच रोग नाय. आता आम्हाला सोडा बाबा, आम्ही शाळा बी स्वच्छ केलीय' असे म्हणत येडशी (ता. उस्मानाबाद) येथील जनता विद्यालयातील निवारागृहात वास्तव्यास असलेल्या परजिल्ह्यातील नागरिकांनी रविवारी (ता. २६) प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत घरी सोडून देण्याची मागणी केली.

नांदेड, लातूर व कर्नाटकातील बिदर जिल्ह्यांतील काही कामगार पुण्यात वितभट्टीवर कामाला होते. लॉकडाऊनमुळे खूप प्रयत्न करूनही त्यांना मूळगावी जाण्यासाठी वाहन मिळाले नाही. अखेर सर्व कामगार मुलांबाळासह पुण्याहून गावाकडे पायी निघाले. तब्बल चार ते पाच दिवसानंतर ते येडशीकडे हद्दीत पोहोचले. जिल्ह्याच्या तपासणी नाक्यावर पकडले गेल्याने त्यांना ७ एप्रिलला येडशी येथील जनता विद्यालयातील निवारागृहात वास्तव्यास ठेवण्यात आले.

हेही वाचलेच पाहिजे....Video-लॉकडाउन : नागरिकांचे प्रयत्न आले फळाला, कसे? ते वाचलेच पाहिजे

गेल्या अठरा दिवसांपासून या नागरिकांबरोबर प्रशासनाचा संवाद सुरू आहे. त्यांच्या जेवणाची पूर्ण सोय केली जात आहे. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे कर्मचारी दररोज अडचणी मांडायचे. कुणाच्या घरात वयोवृद्ध व्यक्ती आहेत, कुणाच्या घरातील सदस्य अपघात झाल्याने दवाखान्यात उपचार घेत आहेत, तर कुणाची लहान मुले शेजारच्या घरात राहताहेत, अशा अडचणी प्रत्येकाने मांडल्या. 
गेल्या अठरा दिवसांपासून दैनंदिन गरजांची पूर्तता करीत त्यांच्या समस्या जाणून घेत सतत संवाद साधला जात आहे.

कोरोनासारख्या आपत्तीवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवश्यक असल्याचे पटवून दिले जात आहे. तसेच तुमच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाही तर तुमचा जाण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही सांगण्यात आले होते. दरम्यान, आता लॉकडाऊन वाढल्याने अनेकांनी आपल्या अडचणी सांगून शासकीय अधिकाऱ्यांकडे गावाकडे पोहोचवून देण्याची मागणी करीत आहेत. 'आता आम्हाला सोडा बाबा, पंधरा दिस होउन गेलं, आम्हाला कुठलाच रोग नाही. आम्ही या शाळेत राहिलो ना, ही शाळा बी आम्ही स्वच्छ केलीय' असे शब्द ऐकून सर्व निरुत्तर होत आहेत. 

आम्ही निवारागृहात येताच सर्व कामगार एकत्र येत संवाद साधतात. त्यांचे मनोबल कसे वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्न केले. विशेष म्हणजे ज्या शाळेत हे राहिले ती पूर्ण शाळा त्यांनी स्वच्छ केल्याने त्यांच्या बदललेल्या मानसिकतेचे दर्शन आम्हाला घडले. त्याचा अभिमानही वाटला. 
- एन. डी. नागटीळक, मंडळ अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad It's been fifteen days, now leave us