माणुसकीला जात नसते, धर्मही नसतो! मुस्लीम युवक घेताहेत सर्वधर्मीय कोरोनाग्रस्तांची काळजी

covid 19 centre in umarga by youngsters
covid 19 centre in umarga by youngsters

उमरगा (उस्मानाबाद): केवळ सरकारवर अवलंबून न राहता, आपणही समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेने येथील मुस्लीम युवकांनी हिंदू-मुस्लीम समाजातील दानशुरांच्या मदतीने ईदगाह येथील फंक्शनल हॉल एका उत्तम सुविधायुक्त कोविड सेंटरमध्ये परिवर्तन केला. सध्या हे कोविड सेंटर प्रशासनाच्या आधिपत्याखाली असले तरी रुग्णांच्या काळजीसाठी येथील युवक सक्रियपणे काम करताहेत. आता १७ मार्चपासून हे सेंटर रुग्णसेवेसाठी पुन्हा सज्ज झाले आहे. येथे मुस्लीम युवकांकडून सर्वधर्मीय रुग्णांची सेवा केली आहे. त्यामुळे माणुसकीला जात नसते, धर्मही नसतो, याचीच प्रचिती येत आहे.

उमरगा शहर व तालुक्यात गतवर्षी मे महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये जागा अपुरी पडत असल्याने मुस्लीम युवकांनी ईदगाहच्या फंक्शनल हॉल कोविड रुग्णांसाठी कार्यरत करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियातून उमरगंस आणि उमरगा डिबेट या व्हॉट्स ग्रुपच्या माध्यमातून आवाहन केल्यावर मोठ्या प्रमाणात या सेंटरसाठी आर्थिक मदत मिळाली होती.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूझ या संस्थेच्यावतीने या कोविड सेंटरसाठी दहा पीपीई कीट देण्यात आले होते. या सेंटरमध्ये ३० बेडची सुविधा आहे. यंदा मार्चमध्ये पुन्हा बाधितांची संख्या वाढल्याने या सेंटरमध्ये रुग्ण दाखल होताहेत. दरम्यान, उमरगा मुस्लीम जमायत कमिटी व ख्याजा मुजावर, अजहर शेख, जाहेद मुल्ला, फैजल पटेल, कलीम पठाण आदी तरुण स्वयंसेवकाची भूमिका बजावत रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहेत. डॉ. वैभव शाईवाले, परिचारिका शिल्पा तोळनुरे, महादेवी चव्हाण, सेवक राजू थोरात, मल्लिकार्जुन होळमुजगे रुग्णांच्या आरोग्याच्या काळजीसाठी सतर्क असतात. 

नाष्टा, चिकन, अंडी आणि व्हेज बिर्याणी 
कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांना रोज औषधोपचार दिला जातो. त्याबरोबरच सकस आहारही महत्त्वाचा असल्याने बाजार समितीचे सभापती एम.ए. सुलतान यांच्या वतीने रुग्णांना रोज सकाळी नाष्टा दिला जात आहे. कधी अंडाकरी, चिकण बिर्याणी, मटणकढीची सोय रुग्णांसाठी केली जाते. शाकाहारी रुग्णांसाठी व्हेज बिर्याणी दिली जाते. डॉ. शाईवाले, सुशील दळगडे, वहाब अत्तार, जाहेद मुल्ला, सचिन लोखंडे, विक्रम (बापू) बिराजदार, सिद्धू स्वामी, दिलीप भालेराव आदींनी जेवणाच्या सोयीसाठी आर्थिक मदत केली. दरम्यान, आरोग्य विभागाच्या बंद पॅकेजची सोय केली जाते. येथील सुविधेबद्दल रुग्ण समाधान व्यक्त करतात. 

ईदगाह कोविड सेंटरमध्ये रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली जाते. डॉक्टर्सकडून नेहमी विचारपूस होते. या ठिकाणी जेवणाची बंडाळ नाही. पोटभर सकस आहार मिळतो. परिसरातील झाडांची सावली मनाला विसावा देते; म्हणून आम्हा रुग्णांकडून झाडाला पाणी दिले जाते. येथील स्वयंसेवकासोबत आम्ही क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतो. 
- जालिंदर सोनटक्के, उमरगा 

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com