मारले अधिकाऱ्याने; गुन्हा मात्र कर्मचाऱ्यावर?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

उस्मानाबाद - नवरात्रीमुळे तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याला महसूल कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने मंदिरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. सोमवारी (ता. 25) मध्यरात्री ही घटना घडला. पोलिसांच्या मते मारहाण करणारे महसूलचे वरिष्ठ अधिकारी होते; मात्र पोलिस अधीक्षकांच्या दबावापोटी महसूल कर्मचाऱ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन व महसूलमध्ये चांगलेच शीतयुद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे.

शिवराज अरुण गिरी (वय 24) हे पोलिस कर्मचारी भाविकांच्या रांगा लावत असताना तुळजापूर तहसील कार्यालयातील दत्तात्रय मेनकुदळे यांनी अरेरावी करत त्यांना मारहाण करण्यात सुरवात केली. त्यांच्याबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचे सांगितले जाते; मात्र पोलिस प्रशासनानेही महसूल अधिकाऱ्याऐवजी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून महसूल व पोलिस प्रशासनामध्ये शीतयुद्ध सुरू होते, त्याचे पर्यवसान आता हाणामारीपर्यंत झाले आहे.

Web Title: osmanabad marathwada news crime