‘मागेल त्याला शेततळे’ योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

उस्मानाबाद - ‘मागेल त्याला शेततळे’ योजना गुंडाळण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सात हजार शेतकऱ्यांनी या योजनेत अर्ज केले आहेत. परंतु आतापर्यंत केवळ एक हजार ६६७ शेतकऱ्यांच्या शेततळ्याची उभारणी झाली आहे. अपुरे अनुदान, किचकट प्रक्रियेमुळे शेतकरी योजनेपासून दूर जात असल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद - ‘मागेल त्याला शेततळे’ योजना गुंडाळण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सात हजार शेतकऱ्यांनी या योजनेत अर्ज केले आहेत. परंतु आतापर्यंत केवळ एक हजार ६६७ शेतकऱ्यांच्या शेततळ्याची उभारणी झाली आहे. अपुरे अनुदान, किचकट प्रक्रियेमुळे शेतकरी योजनेपासून दूर जात असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या (एनएचएम) माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर शेततळे दिले जाते. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात दुष्काळ होता. त्यामुळे एनएचएमच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेततळी घेतली. गेल्या तीन वर्षांपासून शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केली. मात्र या योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदान दिले जात नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपयांचेच अनुदान देण्याचे निश्‍चित आहे. ज्या शेतकऱ्यांना एनएचएम योजनेतून शेततळे मिळाले नाही. 

अशा शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. आतापर्यंत या योजनेसाठी पाच हजार ५६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. दरम्यान अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असली तरी आतापर्यंत केवळ एक हजार ६६७ शेततळी पूर्ण झाली असून, सध्या केवळ ११२ शेततळ्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान, एनएचएममधून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर शेततळे दिले जात असताना ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत मात्र केवळ ५० टक्केही अनुदान दिले जात नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्‍त होत आहे.

योजना गुंडाळण्याची वेळ
मराठवाड्याच्या दुष्काळी पट्ट्यात शेततळे घेतल्यानंतर त्यावर अस्तरीकरण करावे, अशी शेतकऱ्यांची इच्छा असते. वर्षातील केवळ एप्रिल ते जून या तीन महिन्यांतच शेतीला पाणी कमी पडते. अशा वेळी शेततळ्यात साठविलेले पाणी उपयोगी येऊ शकते. त्यामुळे शेतकरी अस्तरीकरणास प्राधान्य देतात. दरम्यान ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत अस्तरीकरण मिळत नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या योजनेकडे पाठ फिरवीत आहेत. परिणामी शासनाला योजना गुंडाळण्याची वेळ आली आहे.

फसवणूक झाल्याच्या तक्रारी
मागेल त्याला शेततळे योजनेत शासनाने जिल्ह्याला उद्दिष्ट दिले होते. हे पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांकडे तगादा लावला. चार शेतकऱ्यांत मिळून लगत चार शेततळे घेण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेवर भरोसा ठेवून शेततळी पूर्ण केली. विशेष म्हणजे योजनेतील सर्वच लाभार्थींना निधीही त्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. परंतु, अस्तरीकरणासाठी प्लॅस्टिक देता येत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याची ओरड शेतकरी वर्गातून होत आहे.

Web Title: osmanabad marathwada news farm pond scheme farmer