अवघ्या तीन टक्के क्षेत्रावरच खरीप पेरणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

उस्मानाबाद - यंदा जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली आहे. तरीही कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात २४ जूनपर्यंत केवळ ३.३ टक्केच पेरणी झाल्याचा अहवाल आहे. 

उस्मानाबाद - यंदा जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली आहे. तरीही कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात २४ जूनपर्यंत केवळ ३.३ टक्केच पेरणी झाल्याचा अहवाल आहे. 

जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्रापासूनच समाधानकारक पाऊस झाला. बहुतांश भागांत पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जमिनीचा वाफसा होताच खरिपाची पेरणी उरकली. काही भागांत सततच्या पावसामुळे पेरणीला विलंब झाला. अद्यापही काही भागांतील पेरणी सततच्या पावसामुळे खोळंबली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकली आहे. काही शेतकऱ्यांनी पिकांची कोळपणीही सुरू केली आहे. जिल्ह्यात यंदा खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख ७२ हजार ६०० हेक्‍टर आहे. शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे सोयाबीनच्या पेरणीला यंदाही पसंती दिली आहे. यंदा वेळेत पाऊस झाल्यामुळे उडीद, मुगाचीही पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३.३ टक्केच क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात कळंब तालुक्‍यात तर पेरणीच झाली नसल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे नजरअंदाजे हा पेरणी अहवाल कितपत खरा, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागातील कृषी सहायकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पेरणी सुरू झाल्यापासून दर आठवड्याला दिला जाणारा अहवालच गेल्या पंधरा दिवसांत कृषी विभागाला प्राप्त झाला नव्हता. मात्र २४ जूनपासून अहवाल प्राप्त होणे सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील चार लाख ७२ हजार ६०० हेक्‍टरपैकी १५ हजार ५०० हेक्‍टरवरच यंदा खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी केवळ ३.३ टक्के आहे.   

यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, तूर, मुगाच्या पेरणीला पसंती दिली आहे. आतापर्यंत उडीद ४.६ टक्के, तूर ३.६ टक्के, मूग १०.२ टक्के, सोयाबीन ६.४ टक्के क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. वास्ताविक पाहता पेरणी झालेले क्षेत्र मोठ्या प्रमाणात असतानाही कृषी विभागाच्या अहवालात मात्र जिल्ह्यात ३.३ टक्केच क्षेत्रावर पेरणी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Web Title: osmanabad marathwada news kharip plantation on 3% field