आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

उस्मानाबाद - गरिबीला कंटाळून बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथील देवकन्या रमेश तानवडे (वय 19) या विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. उस्मानाबादमध्ये ती "बीसीए'च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. घरच्या गरिबीमुळे सातत्याने पैशांची अडचण येत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला, असे तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अशाही स्थितीत आईने आपले हट्ट पुरविले, मी स्वतःहून हा निर्णय घेत आहे, असाही उल्लेख या चिठ्ठीत आहे.

देवकन्याचे वडील रमेश तानवडे यांचे आजाराने काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार. मोठ्या मुलीचे लग्न झाले असून सध्या घरात देवकन्या आणि तिची आई राहत होत्या. घरची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने तिची आई रोजंदारी करून घर, शिक्षणाचा खर्च भागवत होती. त्यातही यंदा पावसाने ओढ दिल्याने दीड एकर क्षेत्रातील उभे पीकही करपून गेल्याने चिंतेत भर पडली होती.

त्यामुळे देवकन्या नैराश्‍यात होती. तिला शिक्षणासाठी पैशांची अडचण भासत होती. दररोज उस्मानाबाद ते बेंबळी प्रवास आणि त्यासाठी करावा लागणारा खर्च भागवावा कसा, या विवंचनेत ती होती. काल आई कामावर गेल्याने घरी देवकन्या एकटीच होती. त्या वेळी तिने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सहाच्या सुमारास आई शेतातून घरी आल्यावर मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले. बेंबळी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

Web Title: osmanabad marathwada news Student's suicide due to financial difficulties