कर्जफेडीच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

उस्मानाबाद - वयोवृद्ध आई-वडील, अपंग भाऊ, राहायला पत्र्याचे घर, लग्नाची चिंता, कर्जाचा डोंगर, पेरणीला पैसे नाहीत या विवंचनेतून येथील तरुण शेतकरी संदीप बलभीम शेळके (वय 27) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यातील खामसवाडी (ता. कळंब) येथे आज पहाटे ही घटना घडली.

खामसवाडीतील तरुण शेतकरी संदीप बलभीम शेळके याच्या वडिलांच्या नावे गावच्या शिवारात साडेचार एकर शेती आहे. शेतात विहीर आहे; परंतु त्या विहिरीलाही पाणी नाही. संदीपच्या घरात वयोवृद्ध आईवडील आहेत. मोठा भाऊ अपंग आहे. संदीपचे शिक्षणही जेमतेम बारावीपर्यंत झाले होते. तो कुटुबीयांसोबत शेती करत होता. गेल्या चार-पाच वर्षांत दुष्काळ होता. पेरणीसाठी खर्च केलेला पैसाही शेतीतून मिळाला नाही. घराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी तसेच शेतातील अन्य कामासाठी वडील बलभीम शेळके यांनी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे 95 हजार रुपयांचे, सोसायटीचेही 35 हजार रुपयांचे कर्ज घेतले. अपंग भावाच्या नावे 12 हजार रुपयांची सोसायटीचे कर्ज आहे. दुष्काळाने कर्जाचा डोंगर वाढला. यंदाच्या वर्षी खत-बियाणे विकत घेण्यासाठी पैसा नव्हता. उत्पन्नाचा अन्य स्रोतही नाही. याची चिंता संदीपला सतावत होती. याच विवंचनेतून संदीपने शुक्रवारी पहाटे स्वतःच्या शेतात जाऊन जगाचा निरोप घेतला.

Web Title: osmanabad marathwada news youth farmer suicide