लोहाऱ्यात आलेला जावई लातूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह

लोहारा : शहरातील प्रभाग सोळा सील करताना नगरपंचायतचे कर्मचारी.
लोहारा : शहरातील प्रभाग सोळा सील करताना नगरपंचायतचे कर्मचारी.

लोहारा (जि. उस्मानाबाद) : गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी लोहारा शहरात येऊन गेलेला जावई लातूर परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. खबरदारीचा उपाय म्हणून लोहारा नगरपंचायतीने शहरातील प्रभाग १६ सील करून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या पत्नीसह पाचजणांना क्वारंटाइन केले आहे.

दरम्यान, या परिसरातील नागरिकांनी किमान चार दिवस घराबाहेर पडू नये अन्यथा पोलिस कारवाई करण्यात येईल, अशी दवंडी नगरपंचायतीकडून देण्यात आली आहे.

लातूरहून एक तरुण बुधवारी (ता. २४) दुपारी बाराच्या सुमारास प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या पत्नीला भेटण्यासाठी शहरात आला होता. परजिल्ह्यातून एकजण आल्याची माहिती कळल्याने काही सजग नागरिकांनी याबाबत गुरुवारी (ता.२५) नगरपंचायत प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने तत्काळ संबंधित तरुणाशी संपर्क करून त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. त्यावेळी ताप असल्याने तरुणाला क्वारंटाइन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला; परंतु नकार देत तो लातूरला निघून गेला.

लातूरला गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गुरुवारी रुग्णालयात दाखल करून घेऊन स्वॅब घेण्यात आला. शुक्रवारी (ता.२७) सकाळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यानंतर लातूर महापालिकेने खबरदारी घेत तो कुणाकुणाच्या संपर्कात आला होता, याची विचारपूस केली असता लोहाऱ्याला गेल्याचे तरुणाने सांगितले. त्यानंतर लगेच महापालिकेने लोहारा नगरपंचायतीचे कर्मचारी बाळू सातपुते यांच्याशी संपर्क करून लोहाऱ्यात आलेली व्यक्ती लातूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे सांगितले. त्यानंतर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी खबरदारी बाळगत शुक्रवारी शहरातील ईदगा मशीद परिसर सील केला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दरम्यान, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या घरातील तीन जणांना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर त्याची पत्नी व अन्य एका महिलेला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याच्या पत्नीचा स्वॅब घेण्यात आला असून, उर्वरित चौघांचे स्वॅब सोमवारी घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com