उमरग्यात छुप्या पद्धतीने गुटखा, माव्याची विक्री

अविनाश काळे
Wednesday, 15 April 2020

लॉकडाऊनमुळे आंतरराज्याच्या सीमा बंद असल्याने वाहनातून होणाऱ्या गुटखा वाहतुकीला चाप बसला; परंतु तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटकातील काही गावातून दुचाकी अथवा छोट्या वाहनातून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथून वाहनांतून गुटख्याची वाहतूक होत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आलेले आहेत. शहर व तालुक्यात गुटखा, मावा चघळणाऱ्या शौकिनांची संख्या मोठी असल्याने पानटपऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे पानटपऱ्यासह साहित्य पुरवणारी दुकाने बंद झाली आणि शौकिनाची चांगलीच पंचाईत झाली; तरीही काही ठिकाणी मावा, गुटख्याचे पार्सल पद्धत छुप्या पद्धतीने सुरू झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान लॉकडाऊन असल्याने आंतरराज्याच्या सीमा बंद असल्याने वाहनातून होणाऱ्या गुटखा वाहतुकीला चाप बसला; परंतु तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटकातल काही गावातून दुचाकी अथवा छोट्या वाहनातून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. 
शहरातील अनेक बेरोजगारांनी पानटपऱ्याच्या व्यवसायातून उदरनिर्वाहाचा मार्ग अवलंबला. शहरासह तालुक्यात जवळपास दीड ते दोन हजार पानटपऱ्या आहेत; पण तेथे पानाचा विडा खाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे, तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीच अधिक होते.

हेही वाचा -  औरंगाबादेत सतरा वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह, संख्या पंचवीसवर 

वास्तविकतः तंबाखूजन्य पदार्थाला बंदी असूनही विक्री सुरू असते. त्याकडे अन्न व भेसळ विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते. दरम्यान, सध्या लॉकडाऊनचा काळ असल्याने बहुतांश पानटपरीधारक घरी बसले आहेत, तर काही जणांनी शिल्लक साहित्याची विक्री माव्याच्या छोट्या पुड्यातून केली. कर्नाटकात एका गुटख्याची एक पुडी पाच रुपयाला तर उमरग्यात वीस रुपयाला तीन मिळायची. लॉकडाऊनमुळे माल शॉर्टेज झाल्याने एक पुडी बारा ते पंधरा रुपयाला दिली जात आहे.

माव्यासह अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे दर वाढले आहेत. महागाईमुळे बऱ्याच जणांनी व्यसनावर लगाम घातला आहे, तर काही जणांना चैन्य पडत नसल्याने महागडे तंबाखूजन्य पदार्थ घेतले जाताहेत. आंतरराज्य सीमा बंद असल्या तरी सीमेलगत असलेल्या अंतर्गत गावाच्या पळवाटेने काही प्रमाणात गुटखा आणला जात असल्याची चर्चा आहे. 

पानाचा विडा मिळेना 
पानमळ्यातील पाने आयुर्वेदिकदृष्ट्या उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. ज्येष्ठ नागरिकांना पान खाण्याची सवय असते; मात्र लॉकडाऊनमुळे पानमळ्यात पाने पिवळी पडताहेत. बाजारपेठेत पाने मिळत नसल्याने अनेकांची सवय मोडली आहे. 

तंबाखूजन्य पदार्थाने कॅन्सरसारख्या भयंकर आजाराने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रस्त्यावर ठिकठिकाणी पिंक मारली जाते. कोरोना विषाणूचा संसर्ग खोकला, सर्दीनंतर होतो आहे. प्राथमिक स्थितीत असणाऱ्या पण लक्षणे न जाणवणाऱ्या व्यक्तीच्या वारंवार होणाऱ्या थुंकीतून विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. 
- डॉ. प्रवीण जगताप, कोरोना रुग्णालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News about Sales of Gutkha