संघटन वाढविण्यावर भाजपचा भर

राजेंद्रकुमार जाधव
रविवार, 27 ऑगस्ट 2017

उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षसंघटन वाढीसाठी भाजपने मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात यशही मिळत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी भूम येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह १४ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पालिकेत एकही सदस्य भाजपचा नसताना पालिकेची सत्ता ताब्यात घेण्यात भाजपच्या नेतेमंडळींना यश आले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संघटन वाढविण्यावर आता जिल्ह्यातील नेतेमंडळींनी प्रयत्न सुरू केला आहे.

केंद्रात व राज्यात सत्ता येण्यापूर्वी जिल्ह्यात भाजपचे मोजकेच नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य होते. गेल्या तीन वर्षांत सत्ता हाती असूनही जिल्ह्यात मात्र भाजपला एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले नाही. जिल्हा परिषदेत चार सदस्य भाजपचे असून, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हा पक्ष सत्तेत सहभागी आहे, तर उमरगा पालिकेत काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत आहे. जिल्हा बॅंकेत भाजपचा एक सदस्य असून, तेथेही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हा पक्ष सत्तेत आहे. दरम्यानच्या काळात भाजपचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांना पक्षाने विधानपरिषदेत संधी दिली. त्यानंतर आमदार ठाकूर यांनी जिल्ह्यात पक्षवाढीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. अन्य पक्षांतील नाराजांना भाजपमध्ये घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. गेल्या काही महिन्यांत काँग्रेसचे विजय दंडनाईक, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १६ ऑगस्ट रोजी भूम पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते संजय गाढवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी भूमच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे यांना भूम शहरात मोठा फटका बसला. सलग तीन निवडणुकांत श्री. गाढवे यांनी पालिका ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर आमदार मोटे यांनीही आता भूम शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार मोटे यांच्या वाढदिवसाचे सर्वाधिक कार्यक्रम भूम शहरातच पार पडले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात मोठे शक्तिप्रदर्शनही केले. 

अस्तित्वासाठी सुरू राहणार लढाई
आगामी काळात आमदार मोटे आणि श्री. गाढवे यांच्यामध्येच भूम शहरामध्ये अस्तित्वासाठी लढाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आमदार मोटे आणि श्री. गाढवे यांची अत्यंत जवळीक होती. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ मंडळी फारशी सक्रिय नव्हती; परंतु श्री. गाढवे यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ मंडळी सक्रिय होत आहेत. त्यामुळे श्री. गाढवे यांच्या जाण्यामुळे भूम शहरात पक्षाचे झालेले नुकसान ही मंडळी भरून काढणार का, याची चर्चा आता तालुक्‍यात सुरू आहे.

Web Title: osmanabad news bjp