आठ वर्षांत तब्बल १०३८ दात्यांनी केले रक्तदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

वर्गणी न जमा करता एखादा उपक्रम राबविता येतो का, याचा विचार आम्ही केला. वर्गणी म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारांशी सुसंगत नसल्याने आम्ही रक्तदान शिबिराचा पर्याय निवडला. शिवाजी महाराजांच्या अनेक मावळ्यांनी रयतेसाठी रक्त सांडले. आपण स्वतःचे रक्त देऊन इतरांना जीवदान देण्याचा प्रयत्न करू, या विचारातून हा संकल्प साजरा केला जात आहे. 
- रोहित निंबाळकर, श्री साई सामाजिक व सांस्कृतिक मंडळ.

उस्मानाबाद - शहरातील श्री साई सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या तब्बल १०३८ दात्यांनी रक्तदान करून शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. गेल्या आठ वर्षांपासून मंडळाचा हा उपक्रम असून, यंदाही तब्बल ३८८ दाते रक्तदान करणार आहेत. सामाजिक उपक्रमातून साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. 

शिवजयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात. मिरवणूक, विविध स्पर्धा, देखावे, फटाक्‍यांची आतषबाजी, विद्युत रोषणाई, व्याख्यान असे उपक्रम राबवून शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र, असे उपक्रम राबविताना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागतो. काहीवेळा वर्गणी गोळा करण्यालाही वेगळेच रूप येते. अशा प्रकारचा शिवजन्मोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीला मंडळाने फाटा दिला आहे. केवळ रक्तदान करून अनेक गरजूंना मोफत रक्त देण्याचा उपक्रम मंडळाकडून राबविला जात आहे. २०१० पासून मंडळाकडून रक्तदानाचा संकल्प नियमितपणे सुरू आहे. २०१० मध्ये ५१, २०११ मध्ये ७८, २०१२ मध्ये ११८, २०१३ मध्ये १२१, २०१४ मध्ये १५१, २०१५ मध्ये १८८, २०१६ मध्ये २१०, तर २०१७ मध्ये ३९१ दात्यांनी रक्तदान केले आहे. यंदा शिवाजी महाराजांची ३८८ वी जयंती असल्याने ३८८ दात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. या रक्तदान शिबिरातून कित्येक रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. शहरातील जिल्हा रुग्णालय, सह्याद्री ब्लड बॅंक तसेच सोलापूर येथील सिद्धेश्‍वर ब्लड बॅंकेत रक्त साठविण्यात येणार आहे. सध्या राज्यात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह आहे. शहरातील चौकाचौकांत बॅनर झळकत आहेत. अशा विविध प्रकारच्या उपक्रमांवर खर्च करण्याऐवजी अशा उपक्रमाची समाजात गरज आहे.

शिवाजी महाराजांनी रयतेसाठी काम केले. रक्ताअभावी अनेक रुग्ण अंथरुणावर खिळून राहतात. अशा रुग्णांसाठी रक्तदान हे श्रेष्ठ दान ठरत असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.

Web Title: osmanabad news blood donate