दिवाळीपूर्वी कर्जमाफी देणे अवघड?

तानाजी जाधवर
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

दिवाळी हा मोठा सण असल्याने 14 ऑक्टोबरपासून पुढील शासकीय सुट्याच्या कालावधीत कार्यालयीन कामकाज कऱण्याच्या सुचना देऊ नये अशी विनंती संघटनेकडून केली आहे. या कालावधीमध्ये कार्यालय सूरु ठेवण्याच्या सुचना दिल्यास महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

उस्मानाबाद : कर्जमाफी दिवाळीच्या अगोदर देण्याची घोषणा अंमलात आणणे शक्य होणार नाही असे दिसत आहे. त्यातही सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लेखापरिक्षक व आयटी विभागामुळेच वेळीच कर्जमाफीची प्रक्रीया होत नसल्याची थेट तक्रार सहकार आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे त्यानी ऐन सणासुदीच्या काळात कार्यालय सूरु ठेवायला लावू नये असे केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य सहकार व कर्मचारी संघटनेना सहकार आयुक्तांना दिला आहे.

संघटनेने आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यासाठी सहकार कार्यलयाकडून व शासनाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या सुचना प्राप्त होत आहेत. वर्ग तीन कर्मचारी ही योजना यशस्वी होण्यासाठी कामकाज पुर्ण करण्याचे प्रयत्न करत आहेत. हे काम 98 टक्के पुर्ण झाल्याचा दावा संघटनेकडून कऱण्यात आला आहे. मात्र लेखापरिक्षण विभागाकडून संबधित संस्थाचे लेखापरिक्षण पुर्ण होत नसल्याने अडचणी येत असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे. या शिवाय आयटी विभाग प्रतिसाद देत नसल्याचेही त्यात सांगितले आहे.

जिल्हा बँका, जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहकार्य करीत नसल्यामुळे या योजनेचे कामकाज होण्यास अडथळा येत आहे. तसेच पुरेसे तांत्रिक प्रशिक्षीत मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदे यांच्या असणा-या अडचणी याबाबीचा विचार न करता सहकार कार्यालयाकडून सहा ऑक्टोबरपर्यंत कामकाज पुर्ण कऱण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. मात्र आयटी विभागाकडून अनेकवेळा अपलोड केलेल्या फायलीमध्ये त्रुटी दर्शविल्यामुळे हे कामकाज होण्यास विलंब होत आहे . एक ऑक्टोबरपासून आज तारखेपर्यंत सणासुदीच्या सुट्यामध्येही कार्यालय सूरु ठेवून कामकाज कऱण्यासबंधी सुचना प्राप्त झाल्या आहेत.

दिवाळी हा मोठा सण असल्याने 14 ऑक्टोबरपासून पुढील शासकीय सुट्याच्या कालावधीत कार्यालयीन कामकाज कऱण्याच्या सुचना देऊ नये अशी विनंती संघटनेकडून केली आहे. या कालावधीमध्ये कार्यालय सूरु ठेवण्याच्या सुचना दिल्यास महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या अगोदर कर्जमाफी देण्याची घोषणा कऱणा-या सरकारच्या अंमलबजावणीला यामुळे खिळ बसणार असे चित्र आहे. तर दुस-या बाजुला पारदर्शक कारभार व्हावा असा आग्रह धरलेल्या सरकारला आपल्या यंत्रणेत समन्वय ठेवणे जमले नसल्याचे वास्तव या पत्रावरुन लक्षात येत आहे.

Web Title: Osmanabad news farmer loan waiver