सरकारकडून जनतेची दिशाभूल - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

उस्मानाबाद - "केंद्र व राज्यातील सरकार जनतेची दिशाभूल व फसवणूक करीत आहे. कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा तोडला, तर सरकारला आणि ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही,' असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजप- शिवसेना सरकारविरुद्ध मराठवाडा पातळीवरील हल्लाबोल आंदोलनाची सुरवात आज झाली. तुळजापूर येथून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित सभेत पवार बोलत होते. "सहा महिने झाले तरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडत आहे. रब्बी हंगामातील पिके आल्यानंतर शेतकरी पैसाही भरतो. तरीही वीज तोडली जात आहे.

शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडली, तर सरकारला आणि ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही,' असा इशारा पवार यांनी दिला. सध्या राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. काही जण अशाप्रकारे मनुवादी विकृती निर्माण करण्याचे आणि तरुणांची माथी भडकावण्याचे काम करीत आहेत. राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे समाज रस्त्यावर उतरला असून, त्याला न्याय हवा आहे. मात्र त्याऐवजी हे सरकार जाईल तेथे गाजर दाखवत असल्याची टीकाही त्यांनी केली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते. हे सरकार उलथवून टाकण्याची गरज असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले.

Web Title: osmanabad news Misguided by the government