वीजबिलाची माहिती ‘एसएमएस’द्वारे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

कळंब - घरगुती वीज वापराची मासिक देयके भरताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीने ‘एसएमएस’ सेवा सुरू केली आहे. तालुक्‍यातील २६ हजार घरगुती वीज ग्राहकांपैकी आठ हजार जणांना ‘एसएमएस’द्वारे माहिती दिली जात आहे.

कळंब - घरगुती वीज वापराची मासिक देयके भरताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीने ‘एसएमएस’ सेवा सुरू केली आहे. तालुक्‍यातील २६ हजार घरगुती वीज ग्राहकांपैकी आठ हजार जणांना ‘एसएमएस’द्वारे माहिती दिली जात आहे.

तालुक्‍यातील येरमाळा, दहिफळ, इटकूर, कळंब, शिराढोण, गोविंदपूर, डिकसळ, मोहा या ठिकाणी वीज उपकेंद्रे आहेत. घरगुती वीजवापराचे २६ हजार ग्राहक आहेत. वीज मीटर रीडिंग मॅन्युअली पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे रीडिंग, बिल, घरपोच बिल न मिळणे यासह अन्य तपशीलांबाबत शेकडो ग्राहकांच्या तक्रारी असतात. शंका, तक्रारींचे निरसन होत नसल्याने त्याचा फटका वीज वितरण कंपनीलाही बसतो. वीज थकबाकी वाढत जाते. त्यावर मार्ग म्हणून वीज कंपनीने घरगुती वीज ग्राहकांसाठी गेल्या महिन्यापासून ‘एसएमएस’ सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत तालुक्‍यातील २६ हजारपैकी आठ हजार ग्राहक ‘एसएमएस’ सेवेशी जोडण्यात आले आहेत. उर्वरित ग्राहकांकडून मोबाईल क्रमांक मिळविण्याचे काम सध्या सुरू आहे. या सेवेद्वारे बिल येण्यापूर्वी आठ दिवस आधीच ‘एसएमएस’द्वारे मासिक बिलाची रक्कम किती आहे, याची माहिती ग्राहकांना मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना बिल भरणा करण्यासाठी व्यवस्थित नियोजन करणे सोपे जात आहे. एखाद्यावेळी घरपोच बिल न मिळाल्यास किंवा उशिरा आल्यास विलंब आकार, दंडापासून ग्राहक दूर राहू शकतात. ऑनलाइन बिल भरणाही शक्‍य होत आहे. यासोबतच वीज केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे वाया जाणाऱ्या वेळेचीही बचत होत आहे. 

‘एसएमएस’ सेवा चांगली असली, तरी ज्याच्या नावे वीज मीटर नाही असे ग्राहकही कंपनीने ‘एसएमएस’सेवेशी जोडले आहेत. त्यामुळे वीज मीटर नसतानाही कशासाठी ‘एसएमएस’ आला, याचा काहींना बोध होत नाही. मोबाईल क्रमांक जमा करतेवेळी ग्राहकांच्या कुटुंबातील व्यक्तीशी संपर्क साधल्यास ही त्रुटी दूर होईल, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.  

सर्व ग्राहक जोडण्याचा प्रयत्न
तालुक्‍यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांना ‘एसएमएस’ सेवेशी जोडण्याचा, त्याद्वारे वीजबिलाची माहिती देण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे. ग्राहकांनी बिल भरतेवेळी किंवा बिल भरणा केंद्रात मोबाईल क्रमांक देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहायक अभियंता सुनील राऊत यांनी केले आहे. पुढील महिन्यापर्यंत तालुक्‍यातील सर्वच उपकेंद्रांअंतर्गतच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती ‘एसएमएस’द्वारे देण्यासाठी पावले  उचलली आहेत,  असेही ते  म्हणाले.

Web Title: osmanabad news MSEB SMS

टॅग्स