‘राष्ट्रवादी’चा मंगळवारी तुळजापुरातून हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

उस्मानाबाद - फसव्या घोषणा देऊन सत्तेवर आलेले सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. केंद्र व राज्यातील सरकार फसवे असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. सर्वसामान्य जनतेच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर येत असून, तुळजापूर ते औरंगाबाद हल्लाबोल यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा प्रारंभ मंगळवारी (ता. १६) तुळजापूर येथून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी भवनमध्ये रविवारी (ता. १४) आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की विदर्भातील यात्रेनंतर मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा होत आहे. मंगळवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन यात्रेला सुरवात होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील आमदार, विविध विभागांचे अध्यक्ष, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दिलेल्या घोषणा, आश्‍वासनांमुळे प्रभावित होऊन जनतेने शिवसेना, भाजपला कौल दिला. मात्र, साडेतीन वर्षानंतर सर्व आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. फसव्या सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल मोर्चा आयोजित केला आहे. त्याची सुरवात तुळजापूर येथून होणार असून, तीन फेब्रुवारीला औरंगाबाद येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समारोप होणार आहे. जून २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ५५० कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम जाहीर केला; मात्र गेल्या तीन वर्षांत केवळ २३ कोटींवरच बोळवण करण्यात आली आहे. सहा हजार कोटींच्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी केवळ २०० कोटींची नाममात्र तरतूद केली आहे. कौडगाव एमआयडीसीतील भूसंपादन होऊनही पुढे काहीच घडलेले नाही. शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनी त्यासाठी अपेक्षित प्रयत्न केले नाहीत. आरोग्यमंत्र्यांकडे पालकत्त्व असतानाही जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्या सुटू शकल्या नाहीत. सध्या परिवहन मंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्त्व आहे. तरीही, उस्मानाबाद बसस्थानकाचा विषय तसाच पडून आहे. अशा विविध मुद्यांवर अपयशी ठरल्याने सरकारचा सार्वत्रिक निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांनी या हल्लाबोल यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

Web Title: osmanabad news NCP tuljapur