रस्त्यावर फेकून दिल्या लसीकरणाच्या बाटल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

उमरगा - तालुक्‍यातील नाईचाकूर रस्त्यावरील सावळसूर मोडजवळच्या खड्ड्यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या डोसच्या बॉटल्स आढळून आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन ही औषधे नेमकी कोठून आली आहेत याचा तपास करीत आहेत.

उमरगा - तालुक्‍यातील नाईचाकूर रस्त्यावरील सावळसूर मोडजवळच्या खड्ड्यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या डोसच्या बॉटल्स आढळून आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन ही औषधे नेमकी कोठून आली आहेत याचा तपास करीत आहेत.

याबाबतची माहिती अशी की, उमरगा-लातूर मार्गावरून नाईचाकूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात पेन्टा आणि टीटीच्या जवळपास तीस लहान बॉटल्या पडल्या होत्या. मंगळवारी (ता.चार) या मार्गावरून जाणारे माडजचे प्रभारी सरपंच गणपती गायकवाड यांच्या त्या निदर्शनास आल्या. पेन्टा औषध साडेतीन वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना प्रत्येकी महिन्याला डोस देण्यासाठी वापरली जातात. ही औषधे महागडी आहेत, शिवाय मार्च व ऑक्‍टोबर २०१९ पर्यंतच्या मुदतीची आहेत. त्यामुळे सध्या या औषधाचा वापर करता येतो, असे असताना ही औषधे फेकून देण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. या संदर्भात दुपारी तालुका आरोग्य अधिकारी सुशील चव्हाण यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तेव्हा त्या ठिकाणी बऱ्याच बाटल्या नव्हत्या; परंतु प्रभारी सरपंच श्री. गायकवाड यांनी सकाळी दोन नमुन्याचा प्रत्येकी एक बाटली घेतली होती दरम्यान ही औषधी शासकीय रुग्णालयातील असावीत असा अंदाज आहे. आणखी दोन वर्षे वापरता येणारी औषधी फेकून देण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खासगी रुग्णालय अथवा औषधी दुकानदारांकडून असा प्रकार झाल्याची शक्‍यता वाटत नाही; परंतु तपासात नेमका प्रकार उजेडात येऊ शकतो.

दोन वेगवेगळ्या नमुन्यांची औषधे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्रत्यक्षात औषधांची बॉटल्स प्राप्त झाल्यानंतर त्यावरील बॅच नंबर पाहिले जाईल. त्यानुसार ही औषधी कोणत्या रुग्णालयाची अथवा ठिकाणाची माहिती समजू शकेल, त्यासाठी या प्रकाराची दखल घेऊन चौकशी केली जात आहे.
-सुशील चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: osmanabad news Umarga news Vaccination Bottles