‘भारत विरुद्ध इंडिया’ ही व्यवस्थेने लादलेली विषम स्पर्धा

‘भारत विरुद्ध इंडिया’ ही व्यवस्थेने लादलेली विषम स्पर्धा

उमरगा - साधनसंपत्तीचे शोषण करणाऱ्या भांडवलशाहीच्या ताब्यात भारत देश आहे. भांडवलशाहीने (इंडिया) सर्वसामान्यांची गळचेपी करणारी बाजारपेठ निर्माण करून, या बाजारपेठेतील वस्तू भारत देशाच्या ग्राहकांच्या माथी मारण्याची कुटनीती सुरू आहे. ‘भारत विरुद्ध इंडिया’ ही व्यवस्थेने लादलेली विषम स्पर्धा आहे, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. भारत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कर्मयोगी श्रीधरराव मोरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सोमवारी (ता.२५) आयोजित कर्मयोगी श्रीधरराव मोरे व्याख्यानमालेत ‘भारत विरुद्ध इंडिया’ या विषयावर श्री. कांबळे बोलत होते. संस्थेचे चिटणीस पद्माकरराव हराळकर, सहसचिव जनार्दन साठे, संचालक शेषेराव पवार, जितेंद्र शिंदे, सुनील माने, अमोल मोरे, प्राचार्य डॉ. घनशाम जाधव यांची उपस्थिती होती.

श्री. कांबळे म्हणाले, की क्रिकेट वगळता भारत कुठेच जिंकला नाही. आपला भारत सर्वच क्षेत्रात मागास असल्याने सातत्याने मारला जातोय. व्यक्ती कुठे जन्माला आला, हे महत्त्वाचे नाही तर त्यांनी काय कार्य केले, हे महत्त्वाचे आहे. राष्ट्र होण्याची एक भाषा, एक संस्कृती असायला हवी; परंतु भारतात विविध भाषा, विविध संस्कृतीसोबतच गुलामी नांदत असल्याने भारत हा देश नव्हे, तर प्रदेश होता. जग आता ऑनलाइन असून, युवकांनी ऑनलाइन राहून जगाच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास करावा. केवळ घराच्या कोपऱ्याचा अभ्यास केला तर मारले जाल. सत्तेचे केंद्रीकरण होणे म्हणजे इंडिया. भांडवलशाहीच्या जोरावर इंडियाने प्रगती केली; पण ती मूळ भारतातील साधन संपत्तीचा ऱ्हास करूनच. माणूस विरुद्ध यंत्र हे सूत्र घेऊन भारत विरुद्ध इंडियात स्पर्धा सुरू आहे. त्यात इंडिया सरस ठरते आहे. भारतात अजूनही लाखो कुटुंबांना अन्न, पाणी मिळत नाही. त्यांच्या अनेक गरजा तशाच आहेत. मात्र दुसरीकडे स्वच्छ भारत अभियान सुरू करून फार्स केला जातोय. भारतात शिक्षण मोफत आहे; मात्र भांडवलशाहीने अत्याधुनिक शिक्षण पद्धती सुरू करून उच्च दर्जाची महागडी शिक्षण पद्धती धनदांडग्याची मक्‍तेदारी करून ठेवली आहे. भारतात लाखो कुंटुबे अजूनही अन्न, पाण्यासाठी तडफडत आहेत, तर दुसरीकडे इंडियामध्ये शेअर्स बाजारातला बैल उधळतो आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइनमधील संघर्ष कायम ठेवायचा अन्‌ भांडवलशाही स्थिर ठेवायची, हा प्रयत्न सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.

प्राचार्य डॉ. जाधव यांनी प्रास्ताविक केले. व्याख्यानमाला संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय अस्वले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे, डॉ. एस. व्ही. बहिरव, बी. एन. गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. जी. तडोळगे, सेवानिवृत प्राचार्य एन. डी. शिंदे, मराठवाडा साहित्य परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कॉम्रेड अरुण रेणके, संयोजन समितीचे प्रा. पी. डी . पाटील, प्रा. डॉ. पी. ए . पिटले, प्रा. डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी, प्रा. व्ही. टी. जगताप, प्रा. बी. व्ही. मोरे, प्रा. एस. ए. महामुनी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com