मिनी मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेच्या 55 गटांच्या आणि आठ पंचायत समितीच्या 110 गणांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मिनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असून शिवसेना, कॉंग्रेस सत्ता कायम ठेवण्यासाठी लढा देत आहेत. 

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेच्या 55 गटांच्या आणि आठ पंचायत समितीच्या 110 गणांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मिनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असून शिवसेना, कॉंग्रेस सत्ता कायम ठेवण्यासाठी लढा देत आहेत. 

जिल्हा परिषदेत गेल्या दहा वर्षांपासून कॉंग्रेस-शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्यूहरचना आखली आहे. उमरग्यात बहुतांश ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत. स्वतःच्या मुलाला, भावाला, नातेवाइकाला निवडणूक सोपी जावी यासाठी परस्पर छुपा अजेंडा राबविला जात असल्याची चर्चा तालुक्‍यात होत आहे. भाजपच्या शिरकावाने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला हादरे बसत असल्याने शिवसैनिक चिंतेत आहेत. तर कॉंग्रेसने शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा जोर वाढविला आहे. तुळजापूर तालुका कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने चार गटांत बाजी मारली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चार जागा कायम ठेवण्यासाठी लढा सुरू झाला आहे. तर बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. लोहारा तालुक्‍यात चार गट असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे समान वर्चस्व असल्याने रस्सीखेच सुरू आहे. उस्मानाबाद तालुक्‍यातील बारा गटांत वर्चस्वाची लढाई सुरू आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेस आणि शिवसेनेने अंतर्गत समझोता करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरा दिला होता. हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेतला आहे.

कॉंग्रेस आणि शिवसेनेतील ताणलेल्या वातावरणाचा फायदा राष्ट्रवादीला होईल, अशी आशा आहे. तर दुसरीकडे शिवसेना स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर 72 गावात कॉंग्रेस वर्चस्वासाठी झगडत आहे. कळंब तालुक्‍यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत होत आहे. शिवाजी कापसे कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेल्याने शिवसेनेचे बळ वाढले आहे. तालुक्‍यातील कॉंग्रेस संपण्याच्या मार्गावर असून शिवसेना, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. वाशीत कॉंग्रेसच्या अस्तित्वाची लढाई असून शिवसेना तसेच राष्ट्रवादीनेही ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. भूममध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरा देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. तर परंड्यात मात्र उपनेते प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न निर्माण झाला असून ज्ञानेश्‍वर पाटील यांची नाराजी कायम असल्याने भाजपला फायदा होण्याऐवजी पुन्हा राष्ट्रवादीचे बळ वाढेल, अशी चर्चा आहे.

Web Title: osmanabad politics