कळंबमध्येही शिवभोजन थाळी केंद्र सुरु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

मोलमजुरी करून जगणाऱ्यांना झोपडीतून बाहेर पडणे कठीण झाले आहे. संचारबंदीमुळे अशा व्यक्तींना बाहेर पडून अन्न मिळविणे जिकरीचे होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे शहरात शिवभोजन थाळी केंद्राचा प्रारंभ झाल्याने अशा व्यक्तींची गैरसोय टळणार आहे.

कळंब (जि. उस्मानाबाद) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जेवणावळीचीही हॉटेले बंद आहेत. त्यामुळे हास्पिटल, मोलमजुरी करीता शहर परिसरात झोपडीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना एकवेळचे अन्न मिळणेही कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ढोकी रस्त्यावर शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

या केंद्राचा प्रारंभ सोमवारी (ता. ३०) तहसीलदार मंजुषा लटपटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गरजू नागरिकांना अवघ्या पाच रुपयांत शिवभोजन थाळी मिळणार आहे. शिवसेनेच्या संकल्पनेतील बहुचर्चित या शिवभोजन थाळीचा विस्तार करण्याच्या निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून तालुका या मुख्यलयांच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

कोरोना संसर्ग या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य भरात संचारबंदी करण्यात आली आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्यांना झोपडीतून बाहेर पडणे कठीण झाले आहे. संचारबंदीमुळे अशा व्यक्तींना बाहेर पडून अन्न मिळविणे जिकरीचे होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. शिवाय शहर परिसरात अनेक कुटुंब मजुरी करण्यासाठी आले आहेत.

संचारबंदीचा फटका अशाही कुटुंबाना बसत आहे. त्यामुळे शहरात शिवभोजन थाळी केंद्राचा प्रारंभ झाल्याने अशा व्यक्तींची गैरसोय टळणार आहे. या वेळी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार परवीन पठाण, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रदीप मेटे, अजित गुरव, दादा खंडागळे, नगरसेवक सतीश टोणगे, गोविंद चौधरी उपस्थित होते. 

आधारकार्ड अनिवार्य आहे 
शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य असून, गरजू नागरिकांसाठी अवघ्या पाच रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. याचा लाभ गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मंजुषा लटपटे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Shiv Bhojan Thali Center started in Kalamb