वडिलाचा दफनविधी झाल्याच्या दिवशीच मुलगा पॉझिटिव्ह

अविनाश काळे
रविवार, 31 मे 2020

एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाने घरातील ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतला; मात्र कोरोना कक्षात उपचार घेणाऱ्या पत्नी, मुलासह नातीला अखेरचे दर्शनही घेता आले नाही. वडिलाचा दफनविधी झाल्याच्या दिवशीच मुलगा पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबासह नातेवाईक हादरले आहेत.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तालुक्यातील बेडगा येथील ज्येष्ठ नागरिकाचा शुक्रवारी (ता. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी (ता.३०) दुपारी सव्वाचारच्या सुमारास बेडगा शिवारातील त्यांच्या शेतात दफनविधी करण्यात आला.

कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल मृताच्या पत्नी, मुलगा व नातीला अखेरचे दर्शन ही घेता आले नाही. मुंबईत मोठ्या मेहनतीने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी राबराब राबणाऱ्या वडिलाच्या मृत्यूने हताश झालेल्या मुलाच्या आई व मुलीवर उपचार सुरू असतानाच त्याचा स्वतःचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबासह नातेवाईक हादरले आहेत.

हेही वाचा : कळमनुरीत बारा हजार गावकऱ्यांची घरवापसी -

बेडगा येथील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी मुंबई येथे गेली होती. लॉकडाउनमुळे गावाकडे परतल्यानंतर एका ६० वर्षीय व्यक्तीचा २६ मे रोजी पॉझिटिव्ह अहवाल आला; मात्र दुर्दैवाने शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनाग्रस्त ज्येष्ठाचा मृतदेह विशेष किटमध्ये ठेवण्यात आला. दफनविधीच्या तयारीदरम्यान बेडगा की उमरग्यात दफनविधी या वादात मृतदेह रुग्णालयात होता. शेवटी बेडगा येथील शेतात दुपारी सव्वाचारच्या सुमारास दफनविधी करण्यात आला. 

मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह 
वडिलाचा मृत्यू झाल्याची माहिती संशयिताच्या कक्षात असलेल्या मुलाला देण्यात आली. वडिलाच्या मृत्यूचे दुःख पचवत पॉझिटिव्ह आलेल्या आईला हे सांगण्याचे धाडस मुलाला होत नव्हते. पत्नी, मुलासह छोट्या चिमुकलीलाही आपल्या आजोबाचे अखेरचे दर्शन घेता आले नाही.

दरम्यान, वडिलाच्या दफनविधीलाही जाण्याचे भाग्य लाभले नसल्याने दु:ख पचवत वडिलांच्या आठवणी काढत रुग्णालयात असलेल्या २७ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि एकच धक्का बसला. एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाने घेरले. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. आई व सात वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत. आता स्वतःचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबच हादरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad The son corona positive on the day of the father's funeral