आठ कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील दहा जण क्वारंटाईन

तानाजी जाधवर
Sunday, 5 April 2020

उस्माराबाद जिल्हयातील नऊ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यांचे अहवाल रात्री येणार असल्याने शहरवासीयांमध्ये भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद : लातूर येथील आठ कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात उस्मानाबाद शहरातील १९ नागरिक आले असल्याचे समोर आले आहे. त्यातील नऊ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. उर्वरित दहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. स्वॅब घेतलेल्या नऊ नागरिकांचे अहवाल रात्री येणार असल्याने शहरवासीयांमध्ये भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

लातूर येथे आठ जण पॉझीटीव्ह आढळल्याने त्यांच्या प्रवासाची माहिती घेतल असता त्यांनी उस्मानाबाद शहरामध्ये काही काळ घालविल्याचे समोर आले. शिवाय त्यांच्यासाठी एका ढाब्यावर येथील नागरिकांनी जेवण्याची सोय केल्याचेही समोर आले आहे.

हरियाणा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या परवानगीचे पत्र त्यांच्या जवळ असल्याने त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली होती, अशी कबुली श्री. राठोड यांनी दिली आहे. हरियाणापासून त्यांनी प्रवास केला असून, पुढे त्यांना कर्नुळकडे जायचे असल्याने त्यांना पाठवून देण्यात आले होते. त्यांनी तुळजापूर, येणेगूर, सास्तुरमार्गे पुढे प्रवास केल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.

आता या सर्वांचे अहवाल पॉझीटिव्ह आढळले असून, उस्मानाबाद शहरामध्ये त्यांच्या संपर्कात अनेकजण आल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांच्या संपर्कात आलेल्याची यादी करण्यात आली आहे. त्यातील नऊ जणांचा त्यांच्याशी अधिक जवळून संपर्क आल्याचे दिसून येत आहे. त्यांचे स्वॅब नमुने शनिवारी (ता. चार) रात्री घेण्यात आले आहेत. तर इतर दहा जणांना त्यांच्या घरी क्वारंटाईन करण्यात आले असल्याचेही श्री. राठोड यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 

दरम्यान, या सर्वांनी उस्मानाबादमध्ये मुक्काम केल्याची चर्चा शहरामध्ये सुरु आहे. पण त्यामध्ये तथ्य नसल्याचे श्री. राठोड यांनी जबाबदारीने सांगून सर्वांना अफवावर विश्वास ठेऊ नये असेही आवाहन त्यांनी केले आहे. या सर्वांच्या संपर्कात काही लोक आल्यामुळे साहजिकच शहरामध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नऊ जणांचे अहवाल रविवारी (ता. पाच) रात्रीपर्यंत मिळणार असल्याने त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यामध्ये गुरुवारी दोन, तर शनिवारी एक जण असे तीन पॉझीटीव्ह आढळल्याने आता चिंता व्यक्त होत आहे. त्यातच आता लातूरमधील पॉझीटीव्ह आढळलेल्या आठ जणांच्या संपर्कात जिल्हयातील काही जण आल्याने आतापर्यंत तालुक्याच्या ठिकाणी सुरु असलेली लागण शहरामध्ये तर येणार नाही ना, अशी भिती व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Ten people quarantine