उस्मानाबाद, तुळजापूर नगरपालिकेला पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

उस्मानाबाद - नगरविकास विभागाकडून देण्यात येणारा उत्कृष्ट नगरपालिकेचा चार कोटी रुपयांचा पुरस्कार उस्मानाबाद नगरपालिकेला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. चार) मुंबईत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी पुरस्कार स्वीकारला.

उस्मानाबाद - नगरविकास विभागाकडून देण्यात येणारा उत्कृष्ट नगरपालिकेचा चार कोटी रुपयांचा पुरस्कार उस्मानाबाद नगरपालिकेला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. चार) मुंबईत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी पुरस्कार स्वीकारला.

स्थानिक प्रशासनात स्पर्धा वाढावी, त्यांनी उत्कृष्ट काम करून जनतेला चांगल्या सुविधा द्याव्यात, यासाठी शासन स्तरावर पुरस्काराचे नियोजन करण्यात आले. उस्मानाबाद पालिकेने यामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. शहरातील नागरिकांच्या गरजा, पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. उस्मानाबाद नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानात उल्लेखनीय काम केले आहे.

शंभर टक्के स्वच्छतागृह उभारल्याने पालिकेला या पुरस्कारासाठी अपेक्षित गुणांची टक्केवारी गाठता आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविण्यातही पालिकेला यश आले आहे. उजनी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत आहे. शहरातील पाणीपट्टी तसेच घरपट्टी वसुलीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून होणारी सर्व विकासकामे ई-टेंडरिंगच्या माध्यमातून केली जातात. याचाही पुरस्कारासाठी विचार करण्यात आल्याने पालिकेला नाशिक आणि औरंगाबाद विभागात पहिले स्थान मिळाले आहे. अपंगांसाठीच्या तीन टक्के निधीपैकी किती निधी खर्च झाला, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील २०१५-१६ वर्षाच्या निधीतील किती निधी खर्ची झाला, यासाठीही पालिकेला गुण देण्यात आले आहेत. शहरातील वृक्षलागवडीसाठी झालेल्या प्रयत्नांचा विचार पुरस्कारामध्ये करण्यात आल्याने पालिकेला चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. 
 

नगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्यांनी घेतला पुरस्कार 
तुळजापुर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुळजापूर नगरपालिकेस सर्वोत्कृष्ट नगरपालिकेचा पुरस्कार देऊन गुरुवारी (ता. चार) गौरविण्यात आले.  मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते प्रभारी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, पालिकेचे मुख्याधिकारी राजीव बुबणे यांनी अडीच कोटी रुपयांचा पुरस्कार ‘क’ वर्गातील सवोत्कृष्ट नगरपालिकेचा पुरस्कार स्वीकारला. वर्ष २०१३ पासून पाणी, स्वच्छता, वसुली यांसह विविध कामांत नैपुण्य दाखविल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रभारी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे म्हणाले, ‘‘कर्मचारी, नागरिक यांच्या सहकार्यामुळे पालिकेस पुरस्कार मिळालेला आहे. रमाई घरकुल योजनेसह विविध योजना राबविल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.’’

पालिकेला प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचा पुरस्कार मिळाला आहे. यातून जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. नागरिकांच्या सहकार्यातून ही स्पर्धा पालिकेला जिंकता आली. यापुढील काळात पालिका एक नंबरवर राहील; यासाठी काम करण्याची जबाबदारी आमची असणार आहे. 
- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद.

माझ्यासाठी तसेच जनतेसाठी हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. पालिकेच्या सर्व विभागांना याचे श्रेय आहे. पालिकेतील सर्वच घटकांची तपासणी केली. यापुढील काळात कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- बाबासाहेब मनोहरे, मुख्याधिकारी, उस्मानाबाद.

Web Title: osmanabad, tuljapur municipal award