एकाच दिवसात दोन टँकर दारू फस्त

सयाजी शेळके
बुधवार, 20 मे 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये विक्री सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानंतर मंगळवारी मद्य विक्रीच्या दुकानासमोर मद्यप्रेमींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

उस्मानाबाद : दोन महिन्याच्या खंडानंतर जिल्ह्यात मद्यप्रेमींनी मंगळवारी (ता. १९) एकाच दिवसात दोन टँकर दारू फस्त केली आहे. सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करीत मद्यप्रेमींचे कोरोना काळातील हे योगदान जोरात असल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अनेक आस्थापना बंद होत्या. उस्मानाबाद जिल्ह्यातही दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये विक्री सुरू करण्याचा आदेश दिला. त्यानंतर मंगळवारी मद्य विक्रीच्या दुकानासमोर मद्यप्रेमींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

अनेकजण रांगेत थांबून मद्या मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी अनेकांनी ऑनलाईन परवानेही काढले. दरम्यान मंगळवारी एकाच दिवसात तब्बल दोन टॅंकर एवढी दारू मद्य प्रेमींनी फस्त केल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून दिसून येत आहे. जिल्ह्यात देशी मद्य विक्रीची ५८ दुकाने आहेत. वाईन शॉप पाच आहेत, तर बिअर शॉपी १३१ आहेत. जिल्ह्यातल्या १३१ बिअर शॉपीमधून सुमारे १४ हजार ९२६ लिटर बिअर एकाच दिवसात फस्त झाली. विदेशी मद्याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. तब्बल नऊ हजार ३२७ लिटर विदेशी मद्य मंगळवारी फस्त झाले. तर देशी मद्यामध्ये सात हजार ८६३ लिटर विक्री झाली. म्हणजेच एकाच दिवसात तब्बल २६ हजार ७१४ लिटर दारू फस्त झाली आहे. एक टँकर १३ हजार लिटरचा ग्राह्य धरले तरी तब्बल २ टँकर दारू फस्त झाली. 

दीड कोटींची विक्री 
बिअरच्या एका लिटरची सरासरी किंमत २०० रुपये असते, असे गृहीत धरता १४ हजार ९२६ लिटर बिअरची तब्बल २९ लाख ८५ हजार दोनशे रुपयांची विक्री झाली. शिवाय देशी मद्यही २०० रुपये प्रति लिटर विकले जाते. त्यामुळे सात हजार ८६३ लिटर देशी मद्याची किंमत १५ लाख ७२ हजार ६०० रुपयापर्यंत जात आहे. विदेशी मद्यामध्ये हजार ते दीड हजार रुपयांचा प्रति लिटरचा सरासरी दर असतो. तो पुढे दोन हजार रुपयापर्यंतही जातो. जिल्ह्यातील केवळ पाच विदेशी मद्याच्या दुकानातून नऊ हजार ३२७ लिटर मद्यविक्री झाली. सरासरी एक हजार रुपये प्रति लिटर किंमत ग्राह्य धरले. तर तब्बल ९३ लाख २७ हजार रुपयांची विदेशी मद्य एकाच दिवसात फस्त केले. या तिन्ही मद्याची एकूण किंमत पाहता तब्बल एक कोटी ३८ लाख ८४ हजार ८०० रुपये एवढी किंमत होत आहे 

एक कोटी महसूल? 
मद्यावर तब्बल ६० ते ७० टक्के एवढा कर आकारला जातो. एक कोटी ३८ लाख ८४ हजार ८०० रुपयांचे मद्य एका दिवसात फस्त झाल्यानंतर सरासरी ७० टक्के जरी कर ग्राह्य धरला तरीही शासनाच्या तिजोरीत तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योगदान जोमात असल्याचे दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Two tankers sell liquor in one day