जेवळीतील युवकाने कुटुंबीयासह दोन ऑटोरिक्षामधून गाठले होते गाव

सुधीर कोरे
बुधवार, 20 मे 2020

मुंबई शहरात ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह चालवणारा जेवळीतील हा युवक दोन ऑटोरिक्षांमधून कुटुंबातील पंधरा जणांसह गावी परतला होता. त्या सर्वांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करून ग्रामपंचायत प्रशासनाने येथील बसवेश्वर विद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

जेवळी (जि. उस्मानाबाद) : मुंबई शहरातून आलेल्या जेवळी (ता. लोहारा) येथील एका तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने बुधवारी (ता. २०) पहाटेपासूनच तातडीच्या उपाययोजना करीत गाव सील केले. दरम्यान, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जेवळी येथील एकूण १५ व्यक्तींना आतापर्यंत विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जेवळी येथील ३० वर्षीय युवक गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई येथील कांदिवली परिसरात कुटुंबासह राहत होता. ऑटोरिक्षा चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्याने तो शुक्रवारी (ता. १५) रात्री आठ वाजता आपल्या मुळगावी जेवळी येथे दोन ऑटोरिक्षांमधून कुटुंबातील पंधरा जणांसह आला. त्या सर्वांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करून ग्रामपंचायत प्रशासनाने येथील बसवेश्वर विद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले होते. शनिवारी (ता. १६) या युवकाला काही प्रमाणात ताप व सर्दीचा त्रास सुरू झाला.

 हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १७) ताप कमी न झाल्याने येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. शेख व सरपंच मोहन पणुरे यांनी स्वॅब तपासण्यासाठी त्या रुग्णास लोहारा येथे पाठविले होते. बुधवारी (ता. २०) पहाटे दीड वाजता या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य प्रशासनासह पोलिस गावात पहाटेच दाखल झाले आहेत.

संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील पत्नी, भाऊ, वडील, चुलता, भाचा असे संपर्कात आलेल्या पंधरा व्यक्तींना ताब्यात घेऊन विलगीकरणाबरोबरच उपचार करुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी लोहारा येथे पाठविण्यात आले आहे. आता आरोग्य विभागाकडून प्रतिबंधित क्षेत्र तयार करून येथे घरोघरी आशा स्वयंसेविका 
व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वे करण्यात येत असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. शेख यांनी दिली. आता प्रशासनाच्या सूचनेनुसार गावात येणाऱ्या रस्त्यावर बॅरेकेटिंग 
करून जेवळी संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. तसेच गावातील सर्व बाजारपेठ बंद ठेवल्याची माहिती सरपंच मोहन पणुरे यांनी दिली. 

मुंबईहून दोन रिक्षांमधून आलेल्या पंधरा जणांना येथील बसवेश्वर विद्यालयातील एकाच रूममध्ये विलगीकरण करण्यात आले होते. जेवणाचा डबा त्यांच्या घरातून दररोज वेगवेगळी व्यक्ती आणून देत होते. या विद्यालयात जवळपास दीडशे नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी एकच बाथरूम असून, पाण्याची टाकी ही एकच आहे. त्यामुळे एकत्र पाणी भरणे, धुणी-भांडी करणे, एकमेकांना भेटणे, एकत्र जेवण करणे असाही प्रकार सुरु होता. 

दरम्यान, प्रशासनाने दक्षता म्हणून संपू्र्ण गाव सील केले आहे. आरोग्य विभागाने पंधरा व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असल्याने अहवालाकडे लोहारा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार विजय अवधाने, गटविकास अधिकारी अशोक काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए. पी. कठारे आदींनी बुधवारी सकाळी जेवळीला भेट देउन पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad The youth had reached the village by autorickshaw