खड्डे बुजवा, अन्यथा बसफेऱ्या बंद

खड्डे बुजवा, अन्यथा बसफेऱ्या बंद

वाशी (जि.उस्मानाबाद) ः वाशी-भूम रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे एसटी बस खिळखिळ्या होत असल्याने भूम आगाराला दर महिन्याला सुमारे दोन लाख 50 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवून हा रस्ता प्रवासासाठी सुखकर करावा, अन्यथा या रस्त्यावरील बसफेऱ्या बंद करण्याचा इशारा भूम आगारप्रमुख अविनाश साखरे यांनी दिला आहे. 


यासंदर्भात संबंधित विभागाला पत्र देण्यात आले आहे. वाशी फाटा ते वाशी शहर तसेच कॉलेज रोड ते बसस्थानकाडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून वाशी फाटा ते बसस्थानकापर्यंत ये-जा करताना बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे कुठला खड्डा चुकवावा असा प्रश्न चालकांसमोर उभा राहत आहे. हीच अवस्था सरमकुंडी फाटा ते भूम या रस्त्याची असून या रस्त्यावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्यावर असलेले खड्डे चुकवता येत नसल्याने बस या खड्ड्यांत आदळत असल्याने बसचे मोठे नुकसान होत आहे; तसेच डिझेलही जास्त लागत असल्याने त्याचाही फटका भूम आगाराला सहन करावा लागत आहे.

भूमहून वाशीकडे निघालेली बस रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वेळेत पोचत नसल्याने प्रवाशांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांत बस आदळल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, बसच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होत आहे. वाशी ते भूम या रस्यावर सध्या भूम आगाराच्या दररोज 24 बसफेऱ्या होतात. तर दरमहा होणाऱ्या बसफेऱ्यांची संख्या 720 एवढी आहे. 720 बसफेऱ्यांमध्ये या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तब्बल दोन लाख 50 हजार रुपयांचा भुर्दंड भूम आगाराला सहन करावा लागत असल्याचे नमूद आहे. 

भूम ते वाशी रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र दिले होते; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने भूम आगाराला पुन्हा पत्र देऊन भोनगिरी ते वाकवड या दरम्यानचा रस्ता भोनगिरी साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रामध्ये येत असल्याने त्या रस्त्याची दुरुस्ती लघुपाटबंधारे विभागाने करून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवणे आवश्‍यक असल्याचे कळविले आहे. बुडीत क्षेत्र वगळून अन्य रस्ता दुरुस्त करण्यात येईल, असे पत्राद्वारे स्पष्ट करीत भोनगिरी ते वाकवड रस्ता दुरुस्तीची जबाबदारी नाकारली आहे. 
- अविनाश साखरे, आगारप्रमुख, भूम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com