बीड जिल्ह्यात 117 पैकी 41 दिवस पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 September 2019

बीड  : मागच्या वर्षीचा तीव्र दुष्काळ आणि यंदाच्या हंगामातही अनेक दिवस उघडीप दिलेल्या पावसाने तीन दिवसांपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आता कुठे पावसाची निम्मी सरासरी ओलांडली आहे. बुधवारी (ता. 25) सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. माजलगाव, धारुर, शिरूर कसार, केज व बीड तालुक्‍यांत मध्यम, तर कुठे रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. 

मागच्या वर्षी वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नव्हता. विशेष म्हणजे नद्या, ओढ्यांमधून पाणीच वाहिले नाही, त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय जलस्रोत कोरडेठाक असल्याने पिण्याच्या पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली. दुष्काळाच्या झळा सोसत यंदाचा पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला; परंतु सुरवातीला काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पुन्हा उघडीपच पडली. यंदाच्या हंगामातील बुधवारपर्यंतच्या 117 दिवसांत केवळ 41 दिवस पाऊस झाला असून तब्बल 76 दिवस कोरडे गेले आहेत.

सोमवारी रात्री बीडसह काही तालुक्‍यांत दमदार पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारीही पावसाने हजेरी लावली असून, बुधवारीही केज, शिरूर कासार, माजलगाव, धारूर व बीड तालुक्‍यांत काही भागांत मध्यम, तर काही भागांत रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. 
आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 53.84 टक्के पाऊस झाला आहे. पावसाळ्याचे मोजकेच दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 666.36 मिलिमीटर असून आतापर्यंत 358.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. माजलगाव तालुक्‍यात सर्वाधिक 538.2 मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वांत कमी शिरूर कासार तालुक्‍यात 230 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Out of 177 only 41 Days Rainfall in Beed