जिल्ह्यातील 223 प्रकल्पांत केवळ 36.41 टक्के पाणीसाठा

File photo
File photo

उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली असली, तरी उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट भेडसावणार असल्याचे संकेत आहेत. 223 प्रकल्पांत केवळ 36.41 टक्केच पाणीसाठा झाला आहे. उस्मानाबाद तालुक्‍यातील चार मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्पात केवळ 12.72 टक्केच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी प्रयत्न करण्याची गरज असून, त्यासाठी पाण्याचा विनापरवाना उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाईची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.


जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली नव्हती. गेल्यावर्षी सर्व प्रकल्पांत केवळ 12.54 टक्केच पाणीसाठा होता. हा पाणीसाठा प्रशासनाने पिण्यासाठी आरक्षित केला होता. त्यानंतर अनेक गावांना अधिग्रहण, टॅंकरद्वारे गेल्या डिसेंबरपासून पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदाच्या पावसाळ्यातही सुरवातीला अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक गावांना सप्टेंबरअखेरपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. यंदा अखेरच्या टप्प्यात दमदार पाऊस झाल्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे चार मध्यम आणि 50 लघुप्रकल्प शंभर टक्के भरले.

तुळजापूर, नळदुर्ग शहर, अणदूरसह परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारा कुरनूर (बोरी) प्रकल्प, मुरूम शहराला पाणीपुरवठा करणारा बेन्नीतुरा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्पात 12.72 टक्के, तर रुई मध्यम प्रकल्पात 5.30 टक्केच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहराला उजनी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. तेरणा प्रकल्पातून तेर, ढोकी, कसबेतडवळे, येडशी या मोठ्या गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता उस्मानाबाद शहराला येथून पाणीपुरवठा करू नये, अशी मागणी या चार गावांनी केली आहे. मुरूम शहराला पाणीपुरवठा करणारा बेन्नीतुरा प्रकल्पही पूर्णपणे भरला आहे. 
सध्याची पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेता आगामी काळात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणच्या प्रकल्पांतून पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे. अशा ठिकाणी पथकांमार्फत कारवाई केली जात असली, तरी ती आणखी तीव्र करण्याची गरज आहे. 

सध्याची टक्केवारी
मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्याची सध्याची टक्केवारी याप्रमाणे ः तेरणा (12.72), रुई (5.30), वाघोली (13.73), रायगव्हाण (0.00), बाणगंगा (61.12), रामगंगा (64.91), संगमेश्वर (57.33), खासापूर (18.56), चांदणी (0.00), खंडेश्वर (0.00), साकत (0.00), कुरनूर (बोरी 100), हरणी (82.86), खंडाळा (100), जकापूर (100), तुरोरी (24.95), बेन्नीतुरा (100 टक्के). 

"निम्न तेरणा'त 35 टक्केच पाणीसाठा 
माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्पात सध्या 35.07 टक्केच पाणीसाठा आहे. निलंगा, औसा, उमरगा, लोहारा तालुक्‍यांतील अनेक गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र याही प्रकल्पांत यंदा अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. 

"सीना-कोळेगाव'मध्ये उपयुक्‍त पाणीसाठा शून्य टक्केच 
परंडा तालुक्‍यातील खासापूर प्रकल्पातच 18.56 टक्के पाणीसाठा आहे. या तालुक्‍यातील चांदणी, खंडेश्वर, साकत मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा झाला नाही. याशिवाय जिल्ह्यातील एकमेव मोठा असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या पाणीपातळीतही वाढ झाली नाही. या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्केच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com