esakal | जी.श्रीकांत यांच्यासह कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर, लातूरचे नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज रुजू
sakal

बोलून बातमी शोधा

G.Srikant

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बदली झालेल्या व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निरोप देण्याची परंपरा सुरू केली होती.

जी.श्रीकांत यांच्यासह कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर, लातूरचे नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज रुजू

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बदली झालेल्या व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निरोप देण्याची परंपरा सुरू केली होती. नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे पदभार सुपूर्द केल्यानंतर याच परंपरेतून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. दहा) श्रीकांत यांना कार्यालयातून निरोप दिला. शुभेच्छा स्वीकारताना श्रीकांत भावनिक झाले. कार्यालयाबाहेर पडून वाहनात बसताना भावना अनावर होऊन त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर उपस्थितांच्या डोळे पाणावले आणि जिल्हाधिकारी कार्यालयात भावनिक वातावरण तयार झाले.

तब्बल तीन वर्ष आठ महिन्यांत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर श्रीकांत यांची दोन दिवसांपूर्वी अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली. आपल्या कार्यकाळात श्रीकांत यांनी सर्वच क्षेत्रात कायम स्मरणात राहील, अशी कामगिरी केली. गंजगोलाईला अतिक्रमणमुक्त केल्यानंतर त्यांच्या कामाची पडलेली वेगळी छाप शेवटपर्यंत कायम राहिली. मिशन दिलासा उपक्रमातून त्यांनी शेतकरी आत्महत्या तर जाणीव जागृती कार्यक्रमातून अपघात रोखण्याचे प्रयत्न केले. जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालय, दयानंद शिक्षण संस्थेचे क्रिकेटचे मैदान, ऑफिसर्स क्लबची इमारत, महापालिकेला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न असे एक अनेक स्मरणीय कामे त्यांनी केली.

प्रशासन व लोकांतील अंतर दूर करून प्रत्येक घटकांसोबत त्यांनी नाते तयार केले. यामुळेच ते लोकप्रिय झाले. कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या संकल्पना राबवून वेगळेपण जपले. कौटुंबिक कार्यक्रमापासून सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी वेगळी थीम घेऊन काम केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठबळ दिले. पदाचा अभिनिवेश बाजूला ठेऊन तो सर्वांमध्ये मिसळले. यामुळेच बदलीची माहिती मिळताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली.

गुरुवारी श्रीकांत हे पदभार सोडणार असल्याचे कळताच मोठ्या संख्येने लोक भेटीसाठी आले होते. त्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारताना श्रीकांत यांचे डोळे पाणावले.श्रीकांत यांनी निरोप देण्यासाठी त्यांनी सुरू केलेली परंपरा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अमलात आणली. त्यांच्या कक्षापासूनच ग्रीन मॅट टाकून त्यावर फुले अंथरली. ‘वुई वील मिस यू सर’, हे वाक्य रेखाटून रांगोळी काढल्या होत्या. श्रीकांत बाहेर पडत असताना दोन्ही बाजूने उभारून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवत ‘श्रीकांत सर झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.

यामुळे श्रीकांत भावनिक झाले होते. या स्थितीत पृथ्वीराज यांच्याकडे पदभार सोपवल्यानंतरही त्यांनी महत्त्वाच्या विषयावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली व पृथ्वीराज यांना ओळख करून दिली. दिवसभर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. कार्यालयाबाहेर पडून वाहनात बसल्यानंतर अश्रूला बांध फुटला आणि त्यांना रडू कोसळले. ते पाहून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना रडू आले. काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण भावनिक झाले.

आज व्यापक कार्यक्रम
श्रीकांत यांचे जिल्ह्यातील काम वर्षानुवर्षे स्मरणात राहणारे आहे. यामुळे त्यांचा निरोप समारंभही स्मरणीय करण्याचा निर्धार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे. यातूनच शुक्रवारी (ता. ११) दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रांगणात त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू होती. यावेळी जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Edited - Ganesh Pitekar