निम्मा पावसाळा उलटला तरी जलसाठे कोरडेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पाचोड - निम्मा पावसाळा उलटला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाचोड (ता. पैठण) परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

पाचोड - निम्मा पावसाळा उलटला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाचोड (ता. पैठण) परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

जूनच्या प्रारंभी पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर पावसाने कायमचीच उघडीप दिली. मोसंबीच्या बागांवर यंदाही कुऱ्हाड चालविण्याची धास्ती बागायतदारांनी घेतली आहे. दीड महिन्यापासून पाऊस गायब असल्याने उधार-उसनवारीचे व्यवहार कोलमडले असून आर्थिक व्यवस्था पूर्णतः ढेपाळले असल्याचे दिसते. गेल्या वर्षाचा अपवाद वगळता पैठण तालुक्‍यात समाधानकारक पाऊस झाला नाही. विहिरींनी पावसाळ्यात तळ गाठल्याने माणसांची तहान भागविणे दुरापास्त झाले. यंदा भर पावसाळ्यापासूनच पाण्यासाठी गावागावांत भटकंती सुरू होऊन टॅंकरची मागणी समोर आली आहे. थेरगाव, वडजी, लिंबगाव, खंडाळा, चौंढाळा, दादेगाव, हर्षी, रजापूर, दाभरूळ, कडेठाण, गेवराई थेरगाव, खेर्डा, नानेगाव, दादेगाव, केकत जळगाव, मुरमा, कोळी बोडखा, कुतूबखेडा येथील ग्रामस्थ पाणी मिळविण्यासाठी आटापिटा करीत आहेत. 

पावसाळ्यात अनेक बागायतदार फळबागा जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. अनेक जण विहिरीसह कूपनलिका खोदण्यावर भर देत असून, त्यांच्यावरील कर्ज वाढत चालले आहे. दरवर्षी टॅंकरचे विकत पाणी घेऊन बागा जगविणे आता आवाक्‍याबाहेर गेले आहे. सततच्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांचे जगणेच होरपळल्यागत झाले आहे. तालुक्‍यात नाथसागरासारखा जलाशय असतानाही जनतेचा घसा कोरडा आहे.  ‘धरण उशाला व कोरड घशाला’ अशी तालुक्‍याची अवस्था झाल्याची अनुभूती पाहावयास मिळते. डोळ्यांदेखत परजिल्ह्याला जाणाऱ्या गळतीच्या पाण्यावर परिसरातील ग्रामस्थ भर पावसाळ्यात तहान भागवीत आहेत.

Web Title: pachod marathwada news water source empty in rainy season