पडेगाव, मिटमिटा भागात जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

कचऱ्याच्या प्रश्नासह पडेगाव, मिटमिटा भागातील नागरिकांच्या पाणी, रस्ता आदी समस्या लवकरच सोडविण्यात येणार आहेत. कचराकोंडी सोडविण्यासाठी शहरातील नागरिकांचे मिळत असलेले सहकार्य हे कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले.  

औरंगाबाद : कचऱ्याच्या प्रश्नासह पडेगाव, मिटमिटा भागातील नागरिकांच्या पाणी, रस्ता आदी समस्या लवकरच सोडविण्यात येणार आहेत. कचराकोंडी सोडविण्यासाठी शहरातील नागरिकांचे मिळत असलेले सहकार्य हे कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले.  

पडेगाव मिटमिटा भागातील रामगोपालनगर येथील नागरिकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी नगरसेवक रावसाहेब आम्ले, सुभाष शेजवळ यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, की मराठवाड्यातील पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शहराला जर कचरामुक्त ठेवायचे असेल तर यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. नागरिकांनी ओला-सुका कचरा यांचे कचराकुंड्यामध्येच वर्गीकरण करावे.

जेणेकरून ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करता येईल त्यासोबतच सुका कचऱ्यापासून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करता येईल. औरंगाबाद महापालिकेने कचरा वर्गीकरणाची सुरू केलेली मोहिम हा स्तुत्य उपक्रम असून, याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यात येत असून, आठवडाभरात शहराची कचराकोंडी संपणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रसंगी ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण कशा पध्दतीने करायचे यासंबधी मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच सुंदर आणि स्वच्छ शहर ठेवण्याची  नागरिकांना शपथ देण्यात आली. याठिकाणी कचऱ्यावर होत असलेल्या प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

Web Title: padegaon mitmita area Collector Coversation Discussion