शिवारभर पसरलेले दुःख साहित्यात यावे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

स्वातंत्र्यसेनानी बाबूराव काळे साहित्यनगरी, सोयगाव - "मराठीला प्रबोधन साहित्याची गरज असून, समाजाला दिशा देणारे वैचारिक साहित्य निर्माण करावे लागेल. अभिमान वाटावा अशा साहित्याची मराठवाड्यात निर्मिती झालेली असतानाच शिवारभर पसरलेले दुःख ग्रामीण साहित्यातून मांडावे,'' असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, 38व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.

स्वातंत्र्यसेनानी बाबूराव काळे साहित्यनगरी, सोयगाव - "मराठीला प्रबोधन साहित्याची गरज असून, समाजाला दिशा देणारे वैचारिक साहित्य निर्माण करावे लागेल. अभिमान वाटावा अशा साहित्याची मराठवाड्यात निर्मिती झालेली असतानाच शिवारभर पसरलेले दुःख ग्रामीण साहित्यातून मांडावे,'' असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, 38व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.

अजिंठा शिक्षण संस्थेतर्फे सोयगाव येथे आयोजित दोन दिवसांच्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आज स्वातंत्र्यसेनानी बाबूराव काळे साहित्यनगरीत करण्यात आले. डॉ. वाघमारे यांनी मराठवाड्यातील साहित्याचा आढावा घेतला. समाधान, खंत अशा संमिश्र भावनांबरोबरच काही अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, ""आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, अशी एकच मराठवाडावासीयांची मागणी आहे. त्याकडे लक्ष दिले जात नसेल तर हक्काचे मिळविले पाहिजे. शिवाय पुरुषार्थ दाखवत स्वाभिमानाने सामर्थ्यशाली होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जगभरातून अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी लोक येतात. मराठवाड्याचा हा पहिला ठेवा आहे, तर संतसाहित्य हा दुसरा ठेवा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, जनाबाई यांनी संतसाहित्यातून वैचारिक योगदान दिले. त्या काळी महिलेने काव्य लिहिणे आश्‍चर्यकारक होते. त्यामुळे जनाबाईंच्या नावाने एखादे अध्यासन केंद्र सुरू करण्याची गरज आहे. महिलासांठी ते साहित्य प्रेरणादायी ठरेल. सध्या मराठवाड्याचे नाव दुष्काळवाडा पडले आहे. पाण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या परिस्थितीत लेखकांनी आपल्या जाणिवा विकसित करणे आवश्‍यक आहे. वर्तमानकाळानुसार लिहिणे, भुतकाळात रमणे किंवा भविष्याचा वेध घेणे या लेखकांच्या तीन भूमिका असतात. बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी पुढे घेऊन जाणारेच लेखन आवश्‍यक आहे.''

दिलीप वळसे पाटील यांनी मराठवाड्याचे वैचारिक योगदान विशद केले. ते म्हणाले, ""मराठवाडा ही संतांची भूमी आहे. तसेच ती महाराष्ट्राला वैचारिक दिशा देणारीही भूमी आहे.''

या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन करून सन्मान करण्यात आला. तसेच संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेचे संपादन ज्योती स्वामी, रमेश औताडे, दिलीप बिरुटे, निर्मला बोराडे यांनी केले आहे. यानंतर शिल्प, ऊर्मी या साहित्य अंकांचेही प्रकाशन करण्यात आले. स्वागताध्यक्ष रंगनाथ काळे यांनी प्रास्ताविक, प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अशोक नाईकवाडे यांनी आभार मानले. या संमेलनाला जिल्ह्यातील साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंबाजोगाईला करा मराठी विद्यापीठ
अध्ययन आणि अध्यापन या दोन पातळ्यांवर भाषिक काम करण्याची गरज आहे. भाषाशास्त्र, लेखनशास्त्र आणि उच्चारशास्त्र यावर आधारित शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथे मराठी विद्यापीठ स्थापन करावे. हिंदी आणि तेलुगू विद्यापीठ असेल तर मराठी विद्यापीठ का नको, असा सवाल डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केला. भाषा मेली की साहित्य मरते आणि साहित्य मेले की संस्कृती मरते, असे ते म्हणाले.

Web Title: Pain should come in literature