एकवीस ग्रामपंचायतींच्या ऑक्‍टोबरात निवडणुका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पैठण तालुका - थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने प्रतिष्ठा पणाला

पैठण - तालुक्‍यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, ऑक्‍टोबर २०१७ मध्ये निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्यामुळे गावपातळीवर राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे असलेले हे पद मिळविण्यासाठी अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांना आव्हान देणारी ही निवडणूक ठरणार आहे. 

पैठण तालुका - थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने प्रतिष्ठा पणाला

पैठण - तालुक्‍यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, ऑक्‍टोबर २०१७ मध्ये निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्यामुळे गावपातळीवर राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे असलेले हे पद मिळविण्यासाठी अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांना आव्हान देणारी ही निवडणूक ठरणार आहे. 

यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी निवडणूक लढविली. त्यात शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या पक्षात अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायतीत सरळ लढत झाली. आता या निवडणुकीत भाजप पक्षही उतरणार असून, निवडणुकीच्या रिंगणात चार राजकीय पक्ष राहणार आहेत. त्यामुळे २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. 

शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे या राजकीय नेत्यांना निवडणुकीत वर्चस्व निर्माण करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत सहभाग घेईल काय, हा प्रश्नच आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या प्रमुख राजकीय संस्थांसह बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे होत असलेल्या २१ ग्रामपंचायतींवर पुन्हा वर्चस्व स्थापन करण्यासाठी शिवसेनेला आगेकूच करावी लागेल तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही शिवसेना, भाजपला शह देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजय मिळविणे काळाची गरज म्हणून निवडणूक मैदानात सामना करावा लागणार आहे. भाजप व काँग्रेसलाही हाच उद्देश ठेवून निवडणूक लढवावी लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरपंचपद खेचून आणणे हाच खरा विजय ठरणार असल्याने मोठी कसरत करावी लागणार आहे. तालुक्‍यातील प्रतिष्ठेच्या लढतीत बिडकीन, नांदर, धुपखेडा, आडूळ, हिरापूर, मुधलवाडी या प्रमुख ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऑक्‍टोबर २०१७ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसोबतच थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी गुरुवारी (ता.२७) दिली. त्यात नारायणगाव, धनगाव, मुधलवाडी, चिंचाळा, जांभळी, आडूळ बु, देवगाव, हिरापूर, वरवंडी खु, बोकुड जळगाव, तारुपिंपळवाडी, गेवराई बार्शी, बिडकीन, दिन्नापूर, पोरगाव, धुपखेडा, नांदर, सालवडगाव, टाकळी पैठण, कृष्णापूर, शेकटा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Web Title: paithan news 21 grampanchyat election in october