शंभर वर्षांपासून इथं कपडे धुतात महिला 

औरंगाबाद : पाणचक्कीच्या नहरीच्या फुटलेल्या बंब्यातून उसळणाऱ्या पाण्यात कपडे धुणाऱ्या महिला आणि डुंबणारी मुले. (छायाचित्र ः मोहम्मद इम्रान) 
औरंगाबाद : पाणचक्कीच्या नहरीच्या फुटलेल्या बंब्यातून उसळणाऱ्या पाण्यात कपडे धुणाऱ्या महिला आणि डुंबणारी मुले. (छायाचित्र ः मोहम्मद इम्रान) 

औरंगाबाद : पाणचक्कीच्या फुटलेल्या नहरीतून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे; पण ही गळती काही नवी नाही. किमान शंभरेक वर्षांपासून हे पाणी नहराच्या फुटलेल्या बंब्यातून उसळून खाम नदीच्या पात्रात धो-धो वाहते. जवळच्या बेगमपुरा भागातील महिलांचे कपडे धुण्याचे हे पारंपरिक स्थळ आहे, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. 

मलिक अंबराची दूरदृष्टी 

सुमारे 400 वर्षांपूर्वी निजामशाहीच्या पंतप्रधानाने, वजीर मलिक अंबर याने हे शहर वसवले. चारही बाजूंनी डोंगराने वेढलेल्या या शहराला पाण्याचा स्रोत मात्र पुरेसा उपलब्ध नव्हता. सैन्याच्या छावण्या आणि वाढत्या लोकवस्तीला पाणी पुरवण्यासाठी त्याने शक्कल लढवली आणि आसपासच्या डोंगररांगेतील पाझर शोधून काढले. तिथं पाणी अडवून ते खापरी नळांद्वारे शहरात आणलं. हीच प्रसिद्ध नहर-ए-अंबरी. अशा सुमारे 17 नहरी औरंगाबादेत आहेत. त्यापैकी पाणचक्की नहर, नहर-ए-पळशी आणि थत्ते नहर आजही जिवंत आहेत. 

फुटलेली नहर पाणचक्कीची 

बेगमपुरा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वेशीलगत काम नदीत फुटलेला बंबा पाणचक्कीच्या नहरीचा आहे. राज्य पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या पाणचक्कीवर सध्या वक्‍फ बोर्डाचा ताबा आहे. त्यामुळे नहरीच्या संवर्धनासाठी आजवर काहीही होऊ शकलेले नाही. पाण्याअभावी पाणचक्कीच्या हौदात टॅंकरने पाणी भरून ते मोटर लावून भिंतीवरून पाडण्याचे नाटक केले जाते; मात्र नहरीची दुरुस्ती केल्यास नैसर्गिकरीत्या पाणचक्की वाहू शकते. 

किमान चार पिढ्यांचा धोबीघाट 

खाम नदीच्या पात्रात फुटलेला हा बंबा म्हणजे बेगमपुऱ्यातील किमान चार पिढ्यांचा धोबीघाट आहे. आजही या परिसरातील महिला दिवसभर कपडे धुण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात. लहान मुलांचीही या पाण्यात डुंबण्यासाठी झुंबड उडालेली असते. फुटलेल्या बंब्यातून उसळणारे हे शुद्ध पाणी पुढे खाम नदीत तसेच वाहून जाते. नहरीचे संवर्धन होईल तेव्हा होईल; पण हे पाणी साठवण्यासाठी काही उपाययोजना केली गेली किंवा नदीपात्रात ते अडवले, तरी या परिसरातील भूजलसाठा वाढेल आणि जलस्रोत तयार होईल, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. 

नहरीचा उपयोग आता संपला आहे आणि त्या मृतवत झालेल्या आहेत, असे प्रशासन म्हणते; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाया जाणारे हे पाणी महापालिकेला दिसत नाही का? एकीकडे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची बोंब होते. टॅंकर पुरवताना त्रेधा उडते; पण पाणी उपलब्ध असताना त्याची किंमत आपल्याला कळत नाही. नहरींचे पुनरुज्जीवन केल्यास, त्या आजही नक्कीच उपयुक्त आहेत. 
- पंकज कहाळेकर, नहरींचे अभ्यासक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com