पीआरसीच्या दौऱ्यात लागणार अधिकाऱ्यांचा अनुभवाचा कस

latur
latur

लातूर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनामुळे पंचायतराज समितीचा दौरा सहा दिवस अलीकडे आला आहे. जिल्ह्यात दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान समितीचा दौरा निश्चित झाला असून दौऱ्यासाठी अधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. समितीच्या दौऱ्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या अधिक असली तरी दौऱ्याची धास्ती सर्वांनाच आहे. यातूनच दौऱ्यानिमित्ताने अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा चांगलाच कस लागणार असून अनुभवाची शिदोरी असलेल्या अधिकाऱ्यांचा अनुभव कामाला येईल, अशी आशाही सर्वांना आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात पंचायतराज समितीच्या दौऱ्याचे नियोजन आहे. विविध कारणांमुळे समितीचा दौरा पुढे ढकलला जात आहे. यातच दौऱ्याची तारीख बदलताना लेखा पुनर्विलोकन तसेच वार्षिक प्रशासन अहवालाची वर्ष बदलली गेली. यामुळे मागील सहा महिन्यापासून अधिकारी समितीच्या दौऱ्याची तयारी करण्यातच व्यस्त आहेत. पाच वेळा दौरा पुढे ढकलल्यानंतर समितीचा दौरा 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान निश्चित झाला. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो. याची माहिती जिल्हा परिषदेने विधानमंडळ सचिवालयाला दिल्यानंतर समितीचा दौरा सहा दिवस अलीकडे निश्चित झाला आहे. या दौऱ्यात समिती सन 2013 - 2014 आर्थिक वर्षाचा लेखा पुनर्विलोकन अहवाल तर सन 2014 - 2015 चा वार्षिक प्रशासन अहवालावर अधिकाऱ्यांची साक्ष घेणार आहे. त्यानुसार तयार केलेली बुकलेट सर्व आमदारांना जिल्हा परिषदेनी पाठवली असून आता सर्वांना दौऱ्याची प्रतीक्षा आहे. 

अनुभव अन् संकटमोचक
जिल्हा परिषदेतील सध्या कार्यरत काही अधिकाऱ्यांना पंचायतराज समिती दौऱ्याचा अनुभव आहे. यात कोणाचा गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना तर कोणाचा अन्य पदावर कार्यरत असतानाचा अनुभव गाठीशी आहे. यातूनच त्यांच्या एवढ्या पीआरसी असे म्हणून समिती दौऱ्याच्या संख्येनुसार संबंधित अधिकाऱ्यांची सांगड घातली जात आहे. बदलून आलेल्या अधिकाऱ्यांनाही यापू्वीच्या जिल्ह्यातील समितीच्या दौऱ्याचा ताजा अनुभव आहे. अनुभव संपन्नता असली तरी त्याच्या जोरावर कोणता अधिकारी जिल्हा परिषदेला संकटमोचक ठरणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.

ओळखीचे अन् कसलेले आमदार  
आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील 28 आमदारांचा समितीत समावेश आहे. समितीत अधिकाऱ्यांच्या ओळखीचे खूप कमी आमदार असले तरी तेच कसलेले आहेत. यात जिल्हा परिषद सदस्य पदाचा अनुभव असलेल्या आमदार चरण वाघमारे यांचीही धास्ती सर्वांना आहे. जिल्ह्यातील आमदार सुधाकर भालेराव, शिक्षक आमदार विक्रम काळे, बाजूच्या बीड जिल्ह्यातील आर. टी. देशमुख, नांदेड जिल्ह्यातील अमर राजूरकर व उस्मानाबाद जिल्ह्यातील राहूल मोटे यांचाही समितीत समावेश आहे. हे सर्व आमदार ओळखीचे असले तरी कसलेले आहेत. त्यांना असलेला समिती कामकाजाचा अनुभव अधिकाऱ्यांच्या अनुभवापेक्षा वरचढ ठरण्याचीच दाट शक्यता आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com