भाजप, 'राष्ट्रवादी'च्या ताब्यात तीन-तीन जिल्हे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मराठवाड्यातील सभापतिपदे - नांदेडमध्ये 8 जागा कॉंग्रेसला
औरंगाबाद - मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची मंगळवारी (ता. 14) निवड झाली. त्यापैकी औरंगाबाद, जालना आणि लातूरमध्ये भाजपचे सर्वाधिक सभापती आहेत. तर, बीड, उस्मानाबाद आणि परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अधिक सभापतिपदे मिळाली. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ठिकठिकाणी मोर्चेबांधणी केली होती.

नांदेड जिल्ह्यात 16 पंचायत समित्या आहेत. त्यापैकी अर्ज अवैध ठरल्यामुळे माहूरची निवडणूक स्थगित ठेवण्यात आली. उर्वरित 15 पैकी 8 सभापती कॉंग्रेसला मिळाले. तर, भाजपला केवळ 4 ठिकाणीच सभापतिपदे मिळविता आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना प्रत्येकी एक-एक सभापतिपद मिळाले. 5 पंचायत समित्या असलेल्या हिंगोली जिल्ह्यात कॉंग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या. तर, एक जागा भाजपला मिळाली. परभणी जिल्ह्यात 9 पंचायत समित्या असून, येथे 5 ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सभापतिपद मिळाले. तर, कॉंग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष व घनदाट मित्रमंडळ यांना प्रत्येकी एक-एक जागा मिळाली. तर एक सभापती हा शिवसेनेचा बंडखोर आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 9 पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यामध्ये भाजपला 5 ठिकाणी सभापती बसविता आले. तर, 2 सभापती कॉंग्रेसचे आहेत. शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी एक-एक सभापती आहे. जालन्यामध्येही अनेक नाट्यमय घडामोडींनंतर भाजपला 4 सभापतिपदे मिळाली. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी सभापतिपदे मिळाली आहेत.

बीड जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने मजल मारली आहे. येथे 11 पैकी सर्वाधिक 7 पंचायत समित्यांची सभापतिपदे राष्ट्रवादी
कॉंग्रेसकडे गेली आहेत. तर, भाजपला 2 सभापतिपदे मिळाली. शिवसेना व शिवसंग्रामकडे प्रत्येकी 1 सभापतिपद गेले.

उस्मानाबाद जिल्ह्यात 8 पंचायत समित्या आहेत. त्यापैकी 5 सभापती हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. तर, 3 ठिकाणी कॉंग्रेसला सभापतिपदे मिळविता आली. लातूर जिल्ह्यातही भाजपला अर्ध्याहून अधिक जागा मिळाल्या. येथील 10 पंचायत समित्यांपैकी 7 सभापतिपदे भाजपने मिळविली. तर, उर्वरित 3 ठिकाणी कॉंग्रेसचे सभापती आहेत.

Web Title: panchya committe possession