निधोना गावात पानी फाउंडेशनमार्फत महाश्रमदान

नवनाथ इधाटे
गुरुवार, 3 मे 2018

जिल्हाभरातून या श्रमदानास महिला, पुरुष व तरुणांनी श्रमदान करुन आपला सहभाग नोंदवला. तालुक्यातील पाणी फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील 54  ग्रामपंचायतीने सहभाग घेतलेला आहे. त्याच धर्तीवर तालुक्यातील निधोना येथे पाणी फाऊडेशन मार्फ़त सुरु असलेल्या श्रमदानात हजारो हात एकवटले आहे.

फुलंब्री : एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तालुका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ व विविध जिल्हातून नोंदणी केलेल्या सुमारे अडीच हजार नागरिकांनी निधोना (ता.फुलंब्री) येथे पानी फाउंडेशनमार्फत आयोजित केलेल्या “सत्यमेव जयते वाटर कप” स्पर्धेमध्ये महाश्रमदान केले.

जिल्हाभरातून या श्रमदानास महिला, पुरुष व तरुणांनी श्रमदान करुन आपला सहभाग नोंदवला. तालुक्यातील पाणी फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील 54  ग्रामपंचायतीने सहभाग घेतलेला आहे. त्याच धर्तीवर तालुक्यातील निधोना येथे पाणी फाऊडेशन मार्फ़त सुरु असलेल्या श्रमदानात हजारो हात एकवटले आहे. या महाश्रमदानासाठी गावकऱ्यांनी स्वतंत्र ग्रामसभा घेऊन महाश्रमदानासाठी येणाऱ्या जलमित्रांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून विशेष समित्यांची ग्रामस्थांनी स्थापना केली होती.

महाश्रमदानासाठी सकाळी सहा वाजेपासुनच भरघोस असा प्रतिसाद मिळत गेला. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यासह औरंगाबाद शहर व परिसरातील नागरिक जो तो निधोना गावाच्या रस्त्याकडे धावतांना दिसुन येत होता. या श्रमदानाच्या ठिकाणाला एकापाठोपाठ एक अनेकांनी गर्दी केल्याने याला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते गेले. जस जसी श्रमदानाची वेळ संपत जात होती तसतसी गर्दी या ठिकाणी वाढतच जात होती. प्रत्येक नागरिकांच्या  हातात टिकास, फाऊडे आणि घमले दिसुन येत होते. शहरातील सुशिक्षितानी मोठ्या आवडीने श्रमदान करुन आगळा वेगळा आनंद लुटत राष्ट्रीय कामात योगदान दिले. श्रमदानासाठी मोठ्या प्रमाणात सिसिटीची आखणी करण्यात आली होती. फुलंब्रीतील खुलताबाद रस्ता - देवगिरी साखर कारखाना येथून श्रमदानाच्या ठिकाणापर्यंत रस्त्यावर दिशादर्शक बॅनर लावण्यात आले होते. ठिकठिकाणी स्वयंसेवकचीही नियुक्त करण्यात आली होती.

बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी फुलंब्री येथून वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर स्वागत समिति, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, कामव्यवस्थापन समिति, आरोग्यसमिती, समन्वय  समिती, मंडपव्यवस्था, पाणी व्यवस्थापन इत्यादी समित्यांची स्थापना ग्रामसभेत करण्यात आली होती. श्रमदान करणाऱ्या जागेवरच चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे उन्हाची झुळक लागली तर त्यांच्यासाठी सावलीचीही व्यवस्था करून श्रमदान कार्यक्रम व्यशस्वी करण्यात आला. या महाश्रमदानानंतर बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. निधोना येथील गावकऱ्यांचे नियोजन पाहून बाहेर गावाहून येणारे नागरिक व पदाधिकारी भारावून जात होते.

Web Title: pani foundation work in phulambri