Vidhan Sabha 2019 : धनंजयपेक्षा पंकजा ठरल्या धनवान; पाहा किती आहे संपत्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

परळी मतदार संघातील मुंडे बहीण भावाच्या लढतीची राज्यभर चर्चा आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या बहीण भावाच्या संपत्ती बद्दल माहिती समोर आली आहे.

परळी : परळी मतदार संघातील मुंडे बहीण भावाच्या लढतीची राज्यभर चर्चा आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या बहीण भावाच्या संपत्ती बद्दल माहिती समोर आली आहे.

पंकजा मुंडे या त्यांचे भाऊ आणि राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांच्यापेक्षा संपत्तीने पुढे आहेत. शेती आणि समाजसेवेच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केल्याचं आपल्या शपथपत्रात म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी शपथपत्रात नमूद केलेली एकूण संपत्ती पाच कोटी 54 लाख 54 हजार 72 रुपये असून धनंजय मुंडे यांची संपत्ती तीन कोटी 65 लाख 61 हजार 244 रुपये इतकी असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे संपतीच्या बाबतीत बहीण ही भावापेक्षा वरचढ असल्याचं स्पष्ट होतंय.

शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांच्याकडे एकही वाहन स्वतःच्या नावावर नाही तर 450 ग्राम सोने आणि 4 किलो चांदी असून, दीड लाख रुपयांचे जडजवाहीर असल्याचं नमुद करण्यात आलंय. त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्याकडे 14 कोटी 33 लाख 55 हजार 429 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 25 लाख 40 हजार रुपयांची एक BMW गाडी आहे. पंकजा मुंडे यांनी शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध एकही प्रलंबित खटला किंवा गुन्हा दाखल झालेला नाही.

तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर विविध आंदोलने तसेच संत जगमित्र साखर कारखाना अशा प्रकरणातील नऊ गुन्हे दाखल असून त्यांच्या नावावर दोन ट्रॅक्टर आणि दोन चारचाकी वाहने आहेत. शेअर्स आणि शेतीमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्या नावावर 3 कोटी 65 लाख 61हजार 244 रुपये जंगम तर 1 कोटी 14 लाख 90 हजार 522 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याकडे 2 कोटी 20 लाख 90 हजार 964 रुपयांची जंगम आणि 25 लाख 14 हजार 635 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यावरून परळीतली लढत ही कोट्यधीश बहीण भावामधील आहे अशी चर्चा सुरू झालीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaja munde and dhananjay munde assets comparison