पंकजांनी `होमपीच'वर तातडीने लक्ष देण्याची गरज

pankaja munde-dhananjay munde
pankaja munde-dhananjay munde

बीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना सध्या दुहेरी पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. राज्य पातळीवरील आपली महत्त्वाकांक्षा त्यांना दूर ठेवून राजकारण करावे लागत आहे.

आपली क्षमता आणि आपल्या पाठीमागे लोकांचा पाठिंबा, याआधारे आपण राज्यातील क्रमांक एकच्या पदाच्या योग्य नेत्या आहोत, असा त्यांचा स्वतःबद्दलचा विश्‍वास होता. मात्र ही संधी त्यांना मिळाली नाही. त्यांनी थोडी कुरकूर करून पाहिली. मात्र पक्षश्रेष्ठींनी योग्य तो संदेश दिल्यानंतर त्यांनी परत आपल्या महत्त्वाकांक्षेचा विषय चर्चेत आणला नाही. त्यांचा दुसरा संघर्ष आहे तो बीड जिल्ह्यातील आपले वर्चस्व कायम ठेवणे. या सोबतच जो ओबीसी समाज (त्यातही वंजारी समाज) दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी होता, त्या समाजाचे पाठबळ कायम ठेवणे. त्यांच्या दुसऱ्या पातळीवरील संघर्षातही त्यांची पीछेहाट होत अससानाचे दिसते आहे. बीडमध्ये त्यांची सध्या एकहाती सत्ता असताना चुलतबंधू धनंजय मुंडे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानांत त्यांची सरशी होत नसल्याचे चित्र आहे. हे चित्र असेच कायम राहिले तर विधानसभा निवडणुकीची लढाई पंकजा यांच्यासाठी धोक्‍याची असणार आहे, एवढे नक्की!

गोपीनाथरावांचे धडे गेले कुठे?
राज्यात नेतृत्व करायचे तर बीड जिल्हा हे होम पीच सेफ असावेच लागणार आहे. पण, अलीकडे त्यांच्या परळीच्या गडालाच सुरुंग लागत आहे. नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्याबरोबर परळीतच त्यांचा मोठा पराभव झाला. या निवडणुकांचा कौल विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा याचा अर्थ नाही. आपण सत्ताधारी असूनही अशा निवडणुकीत मतदार आपल्याला का नाकारतात आणि आपला भाऊ हा विरोधी पक्षात असूनही स्थानिक निवडणुका का जिंकतो, याचे आत्मचिंतन मात्र त्यांना करावे लागेल. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वभावात एक मोकळेपणा होता. समोरच्याला जिंकण्याची, त्याला बळ देण्याची ताकद त्यांच्यात होती. संघर्षातून ते नेते झाले असल्याने संघटन कौशल्याची महती आणि माहिती या दोन्ही बाबी त्यांना जाणल्या होत्या. लोकांना आपलेसे करण्याची त्यांची वेगळी हातोटी होती. त्यामुळेच ते सत्तेत असो किंवा नसो ते नेहमी लोकनेते राहिले. महिला राजकीय नेत्यांना काही मर्यादा असतात. पण जनतेतील आपला पाठिंबा, करिष्मा टिकून ठेवण्यासाठी पंकजा यांना सतर्क झाले पाहिजे आणि बीडच्या जनतेत मिसळले पाहिजे.

जिल्ह्याला वेळ देण्याची गरज
महत्त्वाची खाती सांभाळावी लागत असल्याने त्यांना जिल्ह्यात जादा वेळ देणे अशक्‍य असल्याचे त्यांचे म्हणणे असले, तरी सामान्यांत मिसळणे, सुख-दु:खात सहभागी होणे, जवळीक साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे हाच राजकारणातील महत्त्वाचा घटक आहे. वैयक्तिक कामांसाठी येऊ नका, हे त्यांचे फर्मान आता अडचणीचे ठरत आहे. ज्यांचे लोकांत वजन आहे, अशांना दूर ठेवण्यासाठीच हे फर्मान आहे की काय, असे वाटते. कारण, मुंबई वाऱ्या करणारे आणि पंकजा व खासदार डॉ. प्रीतम मुंडे जिल्ह्यात आल्यानंतर घोळका घालून त्यांच्यापासून सामान्यांना दूर ठेवणाऱ्या मंडळींचे लोकांत किती वजन आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

गोपीनाथ मुंडेंना साथ देणाऱ्या वंजारा समाजासह इतर छोट्या समाजातील अनेक लोक त्यांच्याशी जोडलेले होते. पण, दिवंगत मुंडेंच्या निधनानंतर ही मंडळी त्यांच्यापासून दुरावू लागल्याचे दिसत आहे. माजी आमदार पाशा पटेल, नितीन कोटेचा हे जरी उदाहरणे असली तरी अशी अनेक मंडळी आता पंकजा मुंडेंपासून दूर असल्याचे दिसते. या मंडळींना दूर करण्यामागे पंकजा यांची काही कारणे ठोस असतीलही. मात्र त्यांची जागा घेणारे आणि आपल्यासाठी लढणारे कार्यकर्ते त्या करू शकल्या नाहीत. हे तर सातत्याने पराभवाचे कारण नाही ना?

भाजपचे संघटन आहे कोठे?
दुसरीकडे राष्ट्रवादीत गटतटामुळे आणि एकमेकांना खोडा घालण्यामुळे पक्ष बॅकफुटवर गेलेला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली विजय मालिका सुरू असली तरी तुलनेने वंजारा समाज पंकजा मुंडेंच्याच पाठीमागे अधिक आहे. भगिनी खासदार आणि पक्षाचे इतर चार आमदार व जिल्हा बॅंकेसह आता जिल्हा परिषदेसारखी मोठी संस्था भाजपच्या व पर्यायाने त्यांच्या ताब्यात आहे. पण, जिल्ह्यातील आमदारांसह दुसऱ्या फळीतील नेते आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांचे कंट्रोल नसल्याचे दिसते. केजच्या आमदार संगीता ठोंबरे व माजलगावचे आमदार आर. टी. देशमुख यांना जमिनीवर अद्याप उतरताच आलेले नाही. आमदार लक्ष्मण पवार व आमदार भीमराव धोंडे यांचे ग्राउंडवर वजन असले तरी लक्ष्मण पवार हे भाजपपेक्षा स्वतः:चे अस्तित्व निर्माण करण्यात गुंतले आहेत. भीमराव धोंडेंनी पंकजा मुंडेंऐवजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमार्फत आपला राजकीय रस्ता सुरळीत करण्यावर भर दिला आहे.

या साऱ्या परिस्थितीत बीडची ताकद पूर्णपणे आपल्यामागे उभे करण्यासाठी पंकजा यांना या जिल्ह्यासाठी म्हणून वेळ द्यावा लागेल. लोकांमध्ये असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान द्यावे लागेल. चुकीची वैयक्तिक कामे करण्याची गरज नाही. पण गरजवंतांची उचित वैयक्तिक अडचण दूर केली तर तो त्या नेत्याचा होऊन जातो. त्यामुळे अशा कामांत जनतेला सहकार्य करण्यात काहीच चुकीचे नाही. एखादे सार्वजनिक कमी झाले तरी चालेल, पण वैयक्तिक कामांसाठी नेत्यांनी वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा असते. राज्य सांभाळणाऱ्या नेत्यांना याचा योग्य तो समतोल ठेवावा लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा नेत्यांची यासाठीची कार्यशैलीतून हा समतोल दिसतो. पंकजा यांनी होमपीचवर तातडीने लक्ष देण्याची गरज प्रत्येक निवडणुकीच्या निकालात व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com