Political: पंकजांना सत्तेचा ट्रॅक मिळेना; क्षीरसागरांचा पक्ष कळेना

जिल्हावासीयांच्या स्वप्नातील रेल्वे किमान आष्टीपर्यंत तरी ट्रॅकवर धावायला लागली मात्र पराभवानंतर पंकजा मुंडे यांना सत्तेचा ट्रॅक अद्यापही मिळाला नाही
Political
Politicalsakal

बीड : जिल्हावासीयांच्या स्वप्नातील रेल्वे किमान आष्टीपर्यंत तरी ट्रॅकवर धावायला लागली आहे. मात्र, पराभवानंतर पंकजा मुंडे यांना सत्तेचा ट्रॅक अद्यापही मिळाला नाही. आता आगामी काळात तरी सत्तेचा हा ट्रॅक त्यांना मिळेल, असा समर्थकांचा आशावाद आहे. तर, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची आता शिवसेना नेमकी कोणती? असा प्रश्नही त्यांच्याच समर्थकांना सतावत आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे व क्षीरसागर हे दोन्ही केंद्रस्थानी व कायम राजकीय चर्चेतले घराणे. राजकीय फाटाफुटीही दोन्ही घराण्यांमध्ये घडल्या. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या पंकजा मुंडे दोनदा विधानसभेला विजयी झाल्या आणि मागच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिल्या. तर, मुंडेंच्या घराण्यातील काका - पुतण्या अंकानंतर पुतणे धनंजय मुंडे यांनीही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे कॅबीनेट मंत्रिपद मिळविले.

दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी चुलत भगिनी पंकजा मुंडेंचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. इकडे दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचा राजकीय वारसा चालविणारे जयदत्त क्षीरसागर देखील चार वेळा आमदार राहीले. त्यांच्या घरात देखील काका - पुतणे वादानंतर संदीप क्षीरसागर पहिल्याच प्रयत्नात थेट काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून विधानसभेत गेले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषद व राज्यसभेच्या नेमणुका व निवडणुका झाल्या.

मात्र, यात पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. मात्र, पक्षाने त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद व मध्यप्रदेशचे सहप्रभारीपद दिले आहे. आता राज्यातील सत्ताबदलानंतर त्यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून संधी व मंत्रिपद मिळेल, असा त्यांच्या समर्थकांचा आशावाद कायम आहे. नुकतेच एका कार्यक्रमात खुद्द त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनीही तसा विश्वासवजा आशावाद व्यक्त केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अतुल सावे यांना मिळाल्यानंतर डॉ. मुंडे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात असे मत मांडल्याने समर्थकांच्या अपेक्षा आणखीच उंचावल्या आहेत. मात्र, पंकजा मुंडे राजकीय ट्रॅकवर असल्या तरी त्यांना सत्तेचा ट्रॅक नसल्याने समर्थकांत म्हणावा तेवढा उत्साह नाही.

तर, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनाही मागच्या महायुती सरकारमध्ये शिवसेनेने मंत्रिपदाची सहा महिन्यांची संधी दिली. नंतर त्यांचा पराभव झाला. परंतु, राज्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार असतानाही त्यांना म्हणावा तेवढा स्पेस व राजकीय लाभ मिळाल्याचे चित्र नाही. आता सत्तांतरानंतर क्षीरसागर नेमक्या कोणत्या गटाच्या शिवसेनेने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मागच्या आठवड्यात मंत्री संदीपान भुमरेंच्या दौऱ्याच्या अनेक बॅनरवर त्यांचे छायाचित्रे झळकले असले तरी अद्याप त्यांनी मात्र कोणतीच स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही व दोन पैकी एकाही शिवसेनेच्या नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात ते दिसले नाहीत. वर्षभरापासून नगर पालिका निवडणुकांची चर्चा आहे. सत्तांतर व शिवसेनेतील फुटीच्या अगोदर देखील त्यांच्या गळ्यात भगवा क्वचितच आढळला आहे. नगर पालिका निवडणूक व शहरातील सामाजिक रचनेमुळे क्षीरसागर निवडणुकीनंतरच क्षीरसागर भूमिका स्पष्ट करतील असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. मात्र, यामुळे कार्यकर्ते व समर्थक संभ्रमात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com