ताईंचे आगमन होताच चाहत्यांचा गराडा, मुंडेंच्या निवासस्थानी जनतेच्या समस्यांचे निराकरण 

प्रवीण फुटके
Thursday, 7 January 2021

पंकजा मुंडे यांनी देखील तितक्याच तत्परतेने संबंधितांना फोनद्वारे निर्देश देऊन त्यांच्या समस्या सोडविल्या. परळी मतदारसंघातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी मार्गी लावल्यानंतर त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी देखील यावेळी त्यांनी केली.

परळी वैजनाथ (जि.बीड) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे यशःश्री निवासस्थान नेहमी गर्दीने फुलून गेलेले असते. आज सत्ता नसताना देखील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण ‘यश:श्री' बंगल्यातून होत असल्याचा प्रत्यय भेटीसाठी आलेल्या नागरिकांना आला. आजही त्यांच्याकडे गर्दीचा ओढा पूर्वीप्रमाणेच कायम असून उत्साह देखील तोच आहे.  पंकजा मुंडे यांचे बुधवारी (ता.सहा) रात्री  परळीत आगमन झाले. त्या येताच गुरुवारी (ता.सात) दिवसभर बीड, परळीसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून येणारे सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे कोरोनाचे सर्व नियम पाळून पूर्वीसारखीच गर्दी करून आपल्या समस्या मांडत होते.

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

पंकजा मुंडे यांनी देखील तितक्याच तत्परतेने संबंधितांना फोनद्वारे निर्देश देऊन त्यांच्या समस्या सोडविल्या. परळी मतदारसंघातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी मार्गी लावल्यानंतर त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी देखील यावेळी त्यांनी केली. सत्ता नसली तरी जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात त्या नेहमीप्रमाणेच तत्पर असल्याचे दिसून आले.

मराठवाड्याच्या बातम्या वाचा

सध्या सर्वत्र विवाह सोहळ्यांची धामधूम सुरू असल्याने आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या विवाह सोहळ्यांना हजेरी लावून त्यांनी नववधूवरांना त्यांच्या  वैवाहिक जीवनासाठी सदिच्छा आणि शुभाशिर्वाद दिले. यावेळी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीने अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि फोटोसाठी पंकजाताईंभोवती चाहत्यांचा गराडा झाला. दिवसभर संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे, त्यासाठी संबंधितांना सूचना देणे आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे या व्यस्त दिनक्रमामुळे पंकजा मुंडे यांचा दौरा सर्वसामान्यांच्या सेवेत समर्पित कारणी लागला.

 

संपादन - गणेश पिटेकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde Solve Peoples Problems Beed Politics News