मी वाघीणच - पंकजा मुंडे

सावरगाव घाट (ता. पाटोदा) - संत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे गुरुवारी दसरा मेळाव्यात बोलताना मंत्री पंकजा मुंडे.
सावरगाव घाट (ता. पाटोदा) - संत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे गुरुवारी दसरा मेळाव्यात बोलताना मंत्री पंकजा मुंडे.

बीड - मी वाघीणच आहे. वाघाच्या पोटी जन्म घेतलाय. माझा आवाज तुम्हाला तर ऐकू येतच आहे; पण अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू येत आहे. आपल्याला कुठल्याही पदाची लालसा नसून महाराष्ट्रातल्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला आपले पाठबळ आहे. आपण किंगमेकर तुमच्या हिताचे सरकार आणणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

सावरगाव (ता. पाटोदा) येथे गुरुवारी (ता. १८) दसरा मेळावा आणि संत भगवानबाबांच्या स्मारक लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी विरोधकांचा समाचार घेत आपल्या ताकदीचा अंदाजही दाखवून दिला. त्या म्हणाल्या, ऊसतोड मजूर आपली व्होट बॅंक नाही, तर बॅंक आणि फिक्‍स डिपॉझिट आहे. आयुष्यभर आपण ऊसतोड मजुरांसाठी काम करणार आहोत. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा उद्या शुक्रवारी (ता. १९) होईल. शंभर कोटी रुपयांचा निधी असलेल्या या महामंडळातून मजुरांना विमा, आरोग्याच्या सुविधांसह बैल, ट्रॅक्‍टर खरेदीसाठीही कर्ज मिळेल. संत भगवानबाबांनी समाजाला अध्यात्माची ओळख निर्माण करून दिली, तर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंनी झोपडीपर्यंत राजकारण पोचविले. एका हाकेवर जमलेली गर्दी भगवानबाबांची किमया आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, जलयुक्त शिवार योजनेमुळे चार वर्षांत जिल्ह्यात एकही टॅंकर लागला नाही. विरोधकांनी दहा वर्षांत अडीच लाख घरे बांधली तर आम्ही केवळ दोन वर्षांत दोन लाख ६२ हजार बांधली. लेकीची सत्ता असल्याने विकासाची ओटी भरत आहे. बेघरमुक्त महाराष्ट्र करून दाखविणार आहे.

मंत्री महादेव जानकर, मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख, शिवाजी कर्डिले, सुजितसिंह ठाकूर, मोनिका राजळे, स्नेहलता काजळे, मोहन फड, नरेंद्र दराडे, विनायक पाटील, प्रज्ञाताई मुंडे, भागवत कराड, सविता गोल्हार, रमेश आडसकर, रमेश पोकळे, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती आदी उपस्थित होते. 

डॉ. मुंडेंच्या फेरीला प्रतिसाद
मेळाव्यानिमित्त खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथगड (परळी) ते सावरगाव घाट अशी वाहनफेरी निघाली. या फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. जागोजागी फेरीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

धनंजय मुंडेंना टोला
आम्ही लोकांच्या डोक्‍यावर छत देतोय, तर तुमच्या पोटात का दुखते? तुम्ही एखादा हौद तरी बांधला का, असा टोला पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला. शिर्डी येथे शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या खर्चाबाबत धनंजय मुंडे यांनी टीका केली होती. आम्ही उत्सव, करमणुकीचे कार्यक्रम करत नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. गणेशोत्सवात धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने कार्यक्रम झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com