
Parbhani : पहिल्याच दिवशी जिल्हा कॉपीमुक्त
परभणी : जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. २१) बारावीच्या परीक्षेला सुरळीतपणे सुरुवात झाली. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला एकही गैरमार्गाचे प्रकरण समोर आले नाही. त्यामुळे कॉपीमुक्त अभियान काटेकोरपणे राबवले जात असल्याचे चित्र आहे. तरीदेखील काही परीक्षा केंद्रांच्या काही दालनात पर्यवेक्षकांच्या मेहरबानीने परीक्षार्थी मुक्त वावर करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील ५९ परीक्षा केंद्रावर मंगळवारी सुरुवात झाली. परीक्षेपूर्वी अर्धा तास उपस्थित राहण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना असल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा केंद्रावर हजेरी लावली होती.
बहुतांश केंद्रावर विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना केंद्रात, दालनात प्रवेश दिला जात असल्याचे चित्र होते. वेळापत्रकानुसार मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर सकाळी ११ ते दोन यावेळेत होता. परंतु, मंडळाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दहा मिनिटे वाढवून देण्यात आली होती. या परीक्षेसाठी २४ हजार ७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी सोमवारी २२ हजार ५८९ परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली. उपस्थितीचे हे प्रमाण ९३.८४ टक्के आहे. तर एक हजार ४८२ परीक्षार्थी गैरहजर राहिले, अशी माहिती शिक्षणाधिकारी आशा गरुड, उपशिक्षणाधिकारी गणराज येरमाळ यांनी दिली. म्हणजे जवळपास सहा टक्के परीक्षार्थी गैरहजर राहिले असून, याचा जिल्ह्याच्या निकालावर निश्चितच परिणाम होणार आहे.
पहिल्याच दिवशी जिल्हा कॉपीमुक्त
जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल, सदस्य सचिव शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान गांभीर्याने राबविण्याचा निर्धार केला आहे. श्रीमती गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक रागसुधा आर., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कंबर कसली असून,
त्यामुळे गरैरप्रकार करणाऱ्या व त्यातून मोठी माया जमविणाऱ्या केंद्रसंचालकांचे धाबे दणाणले आहे. श्रीमती गोयल यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांना भरारी पथक प्रमुख नियुक्त्या दिल्या.
त्यांच्यावरच परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक नियुक्त करण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वितेसाठी या पथकप्रमुखांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ही पथके बहुतांश ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर इंग्रजी, विज्ञान व गणित विषयाच्या पेपरला ठाण मांडून बसणार आहेत. पहिल्या दिवशी मात्र या पथकांना कुठेही गैरप्रकार आढळून आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कागदी कॉपींना आळा, तोंडी मात्र सुरूच
बहुतांश परीक्षा केंद्रावर कागदी कॉपींना आळा बसल्याचे चित्र आहे. पुस्तक, गाइडची कामे, मायक्रो कॉपीचे प्रकार, कागदावर लिहून नेण्याचे प्रकार काही प्रमाणात बंद झाल्याचे चित्र आहे. परंतु, अनेक परीक्षा केंद्रांवर वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे मात्र सांगितली जात असल्याची चर्चा आहे.
त्यामध्ये काही शहरी तर काही ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. काही केंद्रांवरील काही दालनात पर्यवेक्षक मेहरबान झाल्यामुळे परीक्षार्थींचा उत्तरे मिळविण्यासाठी मुक्त वावर होत असल्याचीदेखील माहिती सूत्रांनी दिली. बैठ्या पथकांनी हे प्रकार रोखल्यास निश्चितच जिल्हा कॉपीमुक्त होईल, यात शंका नाही.
सुविधांची वानवा
शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना सर्व सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. बसण्यासाठी ड्वेलडेस्क, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत पंखे, जनरेटर, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, रॅम्प आदी सुविधा अनिवार्य केल्या आहेत. परंतु, अनेक परीक्षा केंद्रावर यापैकी काही सुविधांची वानवा असल्याचे चित्र आहे.